पिंपरी : वाढत्या अपघातांना जबाबदार ठरत असलेल्या आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट्स आणि त्यांच्या अवजड वाहनांवर अखेर पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाने थेट कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयात सोमवारी (दि. 26) ही बैठक घेण्यात आली.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील, पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्त दीपककुमार सिंगला, प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, हिंजवडी आयटी पार्क प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत सर्वाधिक भर आरएमसी प्लांटच्या ट्रकचालकांचा बेदरकार वेग, ब्लाईंड स्पॉटमुळे होणारे अपघात, अनफिट वाहने, अनधिकृत प्लांट्सची वाढ आणि नियमभंग वाहतूक या मुद्द्यांवर देण्यात आला. हिंजवडी आयटी पार्कसारख्या लाखो कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या प्रवासात ही अवजड वाहने मृत्यूचे सावट बनत आहेत, याची गंभीर दखल अधिकाऱ्यांनी घेतली. तसेच, या पुढे आरएमसी प्लांटची मनमानी चालणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. त्यासाठी पोलिस, पीएमआरडीए आणि आरटीओ कडून विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात अवजड वाहने वाहतूक करत असतात. मोठे रस्ते असल्याने या वाहनांचा वेगही जास्त असतो. हिंजवडी, वाकड, बावधन परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने या अवजड वाहनांची नेहमीच ये- जा सुरू असते. त्यामुळे या परिसरात या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्याही जास्त आहे. हे अपघात टाळण्यासाठी बैठकीत शहरात अवजड वाहनांसाठी ताशी 30 किलोमीटर वेगमर्यादा ठरविण्यात आली आहे.
विनापरवाना व बेपरवाईने चालणाऱ्या प्लांट्सवर कारवाई.
अवजड वाहनांची फिटनेस तपासणी प्लांट परिसरातच करण्याचा आदेश देऊन निकृष्ट ट्रक रस्त्यावर येऊ नयेत याची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
जड वाहनांकरिता आधुनिक सुरक्षा उपाय अनिवार्य करण्यात आले असून पालन न करणाऱ्या प्लांटना नोटीस व दंड सुनावला जाणार आहे.
आरएमसी प्लांटशी संबंधित बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्यात बॅरिकेड्स ठेवून अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व वाहनमालकांना नियमांचे पालन, प्रशिक्षण आणि अपघात टाळण्याबाबत कठोर सूचना
आरएमसी ट्रकांमुळे प्राणांतिक अपघात घडला, तर भारतीय न्याय संहिता लागू करून थेट गुन्हा दाखल केला जाईल. कोणत्याही प्लांट किंवा वाहनमालकाची गय केली जाणार नाहीविवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग