खराळवाडी: पिंपरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोरवाडी चौक, वल्लभनगर, शगुन चौक, नाशिक फाटा या वर्दळीच्या चौकांमध्ये पीएमपीएमएल बसचालकांकडून वाहतूक सिग्नलचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, पादचारी मार्ग ओलांडणे आणि घाईगडबडीत चौक पार करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एक प्रकारे पीएमपीचालक वाहतुकीच्या नियमांनाच तिलाजंली देताना दिसून येत आहेत; परंतु वाहतूक पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत.
शहरातील वर्दळीचे चौक, बीआरटी मार्गावरील जंक्शन तसेच प्रमुख रस्त्यांवर पीएमपी बसकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे अनेक वाहनचालक आणि नागरिकांचे म्हणणे आहे. मोठ्या आकाराच्या बस वेगात सिग्नल तोडून गेल्यास अपघाताची शक्यता अधिक वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते.
काही चौकांमध्ये सिग्नल हिरवा होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या वाहनांच्या समोरून बस पुढे निघून जात असल्याने वाहतुकीत गोंधळ निर्माण होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पीएमपी प्रशासनानेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. मात्र, काही चालकांकडून वेळेच्या दबावाखाली किंवा निष्काळजीपणामुळे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
अपघाताचा धोका वाढला
वाहतुकीच्या नियमानुसार लाल सिग्नल तोडणे हा गंभीर वाहतूक गुन्हा आहे. मोठ्या बसकडून होणारे असे उल्लंघन केवळ इतर वाहनचालकांसाठीच नव्हे, तर पादचाऱ्यांसाठीही धोकादायक ठरू शकते. एखादी छोटी चूकही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते.
कठोर कारवाईची मागणी
पीएमपी बसचालकांकडून होणाऱ्या सिग्नल उल्लंघनाच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चौकांमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी, नियम तोडणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि बसचालकांना नियमित प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पीएमपी बसचालक सर्रासपणे वाहतुकीची नियम तोडून बस चालवताना दिसतात. त्यांना प्रशासनाची भीती राहिली नाही. त्यामुळे वाहतूक रहदारीला अडचणी येतात. त्यामुळे सिग्नल तोडणाऱ्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.अजय धोत्रे, नागरिक
सिग्नल परिसरात गतिरोधक उभारणीची सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका आणि पीएमपी वाहतूक विभागाच्या संयुक्त बैठकीत महापालिकेला केली आहे. तसा महापालिकेच्या बैठकीत निर्णय झाला आहे. तरी तो लवकरच लागू होईल. नियम तोडून सर्रासपणे भरवेगाने सिग्नल तोडणाऱ्या बसचालकांवर स्कोड थ्रो कारवाई केली जात आहे. तसे काही आढळून आल्यास बसचा फोटो काढून पीएमपी प्रशासनाला पाठवल्यास त्याचा फाइन बसचालकाच्या खिशातून कापला जातो.अमित डोळस, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, पिंपरी