Nilu Phule Natyagruha Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Gurav Nilu Phule Natyagruha: पिंपळे गुरव नटसम्राट निळू फुले नाट्यगृह दुरवस्थेत; दुरुस्तीची मागणी तीव्र

कोट्यवधी उत्पन्न असूनही देखभालीकडे दुर्लक्ष; कलाकार व नागरिकांकडून सुरक्षिततेबाबत प्रशासनावर

पुढारी वृत्तसेवा

उमेश सणस

पिंपळे गुरव: शहरातील कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, रसिकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा आणि विद्यार्थ्यांच्या कला-सादरीकरणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महापालिका प्रशासनाने पिंपळे गुरव येथे उभारलेले नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आज दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या नाट्यगृहाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून, कलाकार, आयोजक आणि रसिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पिंपळे गुरव परिसरातील हे नाट्यगृह मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा, महाविद्यालये तसेच विविध सांस्कृतिक संस्थांसाठी प्रमुख आकर्षण ठरले आहे. सांगवी, औंध, बाणेर, पाषाण, चतु:ृंगी, वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, कासारवाडी, दापोडी तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शैक्षणिक संस्था येथे स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कला सादरीकरणासाठी प्राधान्याने नाट्यगृहाची निवड करतात. मोजके सोमवार वगळता वर्षभर नाट्यगृह बुक असते. नाटकांचे प्रयोग तुलनेने कमी असले तरी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते. यामुळे महापालिकेने तातडीने नाट्यगृहाची पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पालिकेला मिळते 43 लाखांचे उत्पन्न

नाट्यगृहात सुसज्ज रंगमंच, वातानुकूलित हॉल, विद्युत व्यवस्था, पार्किंग सुविधा अशा विविध सोयी उपलब्ध आहेत. मुख्य प्रेक्षागृहात 389 तर बाल्कनीमध्ये 169 खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात नाट्यगृहातून तब्बल 43 लाख 25 हजार 692 रुपये इतके उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. एवढे मोठे उत्पन्न मिळूनही देखभाल आणि दुरुस्तीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.

...या गोष्टींची करावी लागेल दुरुस्ती

सध्या नाट्यगृहातील अनेक भाग धोकादायक बनले आहेत. व्हीआयपी दरवाज्यांना कडीकोयंडे नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉलमवरील फरशा निघालेल्या आहेत. मुख्य स्टेजवरील पीओपी तुटून खाली पडण्याच्या अवस्थेत असून, कधीही मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पॅसेजमधील छताचे भाग तुटलेले आहेत. महिला स्वच्छतागृहातील दरवाज्यांचे कडी-कोयंडे तुटलेले असून फ्लश यंत्रणा नादुरुस्त झाल्यामुळे सतत पाणी वाहत आहे. एक्झॉस्ट फॅन बंद अवस्थेत आहे. अनेक दरवाज्यांचे स्टॉपर खराब झाले आहेत. याशिवाय प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेचीही दयनीय अवस्था झाली आहे. अनेक खुर्च्यांचे हँडल तुटलेले असून, बसताना प्रेक्षकांना दुखापत होत आहे. सांस्कृतिक वैभवाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाची झालेली दुरवस्था पाहून कलाकार आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नाट्यगृहातील दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी त्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, भांडवली निधीची तरतूद नसल्यामुळे काम रखडले होते. आता निधी उपलब्ध झाल्यानंतर दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असून, पुढील दोन-तीन दिवसांत सर्व कामे पूर्ण होतील.
उमेश मोने, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, ह क्षेत्रीय कार्यालय.
नटसम्राट निळू फुले नाट्यगृह हे पिंपळे गुरव परिसरातील कलाकारांसाठी महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. नागरिकांनी आणि कलाकारांनी मांडलेल्या समस्या गांभीर्याने घेतल्या असून, संबंधित विभागाला तातडीने पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाट्यगृहातील दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. प्रेक्षक आणि कलाकारांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आवश्यक निधी उपलब्ध करून नाट्यगृह सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.
ज्ञानेश्वर जगताप, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT