पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणार्या पवना धरणात 43.67 टक्के साठा शिल्लक आहे. तीव्र उन्हामुळे तसेच, पाण्याची मागणी वाढल्याने पाण्याचा साठा वेगात कमी होत आहे. हा साठा पिंपरी-चिंचवड शहराला येत्या 100 दिवसांत म्हणजे जुलैअखेरपर्यंत पुरवणार आहे. तरी, नागरिकांनी अतिकाटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेकडून पवना नदीवरील रावेत येथील बंधार्यातून दररोज 520 एमएलडी पाणी उचलले जाते. तेथून ते अशुद्ध पाणी प्राधिकरण, निगडी येथील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राकडे पाठवले जाते. तेथे पाण्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरण केले जाते. ते पिण्यायोग्य पाणी संपूर्ण शहराला पुरवले जाते. महापालिकेकडून गेल्या सव्वासहा वर्षांपासून दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच, एमआयडीसीकडून 30 एमएलडी पाणी घेऊन शहरातील काही भागास पुरवले जात आहे. आंद्रा धरण पाणी योजनेअंतर्गत निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधार्यातून दररोज 80 ते 90 एमएलडी पाणी उचलून चिलखी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून त्या परिसरात पुरवले जाते.
तीव्र उन्हामुळे पवना धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. धरणात बुधवारी (दि.25) सायंकाळपर्यंत 43.67 टक्के पाणी शिल्लक आहे. धरणातून पिंपरी-चिंचवड शहर, एमआयडीसी, काही नगरपालिका व ग्रामपंचयातीला पाणी दिले जाते. सध्याचा पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला पुढील 100 दिवस पुरेल इतका आहे. जून महिन्यापर्यंत पावसाने हजेरी लावल्यास शहराला पाणी संकटाचा सामना करावा लागणार नाही. मात्र, पाऊस लांबणीवर पडल्यास शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
शिल्लक पाणी न फेकण्याचे आवाहन
महापालिकेकडून संपूर्ण शहराला दिवसाआड समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा केला जात आहे. तीव्र उन्हामुळे पााण्याचा वापर वाढल्याने सध्या पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी पाण्याचा अतिकाटकसरीने वापर करावा. अंगण, आवार, जिने तसेच, वाहन धुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करू नये. शिल्लक पाणी दुसऱ्या दिवशी फेकून देऊ नये. पाण्याची गळती होऊ नये यासाठी नादुरुस्त नळ व जोड दुरुस्त करून घ्यावेत, असे आवाहन पालिका पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
पाणीटंचाईच्या तक्रारीत वाढ
पाण्याची मागणी वाढल्याने काही भागांत कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तर, काही भागांत अपुरा, दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महापालिका सर्वसाधारण सभेत पाण्यावर प्रशासनाला धारेवर धरले जात आहे. तर, संपूर्ण शहरात समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे.