मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेचे काम संथगतीने सुरू आहे. मोठ्या प्रमाणातील वाहतूक रहदारीमुळे कामास अडथळे निर्माण होत आहेत. या मार्गाचे काम संपण्यास 2027 अखेर उजाडू शकते. त्यानंतर निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड परिसरातील नागरिकांना थेट स्वारगेटपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल.
चिंचवड येथील सेंट मदर टेरेसा उड्डाण पूल ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प या 4.519 किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मार्गाच्या व्हायाडक्ट कामाची निविदा डिसेंबर 2023 ला प्रसिद्ध करण्यात आली. या मार्गाचा आणि तीन स्टेशनचा खर्च 910 कोटी 18 लाख रुपये इतका आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून ते काम 15 मार्च 2024 ला रेल विकास निगम लिमिटेडला या केंद्रांच्या कंपनीला देण्यात आले. कामाची मुदत 3 वर्षे 3 महिने आहे.
सध्या निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनस, निगडीच्या टिळक चौकापासून चिंचवडच्या सेंट मदर टेरेसा उड्डाण पुलापर्यंत मेट्रो मार्गिकेच काम सुरू आहे. मार्गावरील अनेक ठिकारी पिलर उभे राहिले आहेत. आकुर्डीतील खंडोबा माळ चौकापासून बजाज ऑटो कंपनीपर्यंत सेगमेंट जोडणी पूर्ण झाली आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनस येथे स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच, या मार्गावरील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, टिळक चौक, खंडोबा माळ चौक आणि चिंचवड स्टेशन या चार मेट्रो स्टेशनच्या जिन्याचे कामेही संथगती सुरू आहेत.
काम सुरू होऊन दोन वर्षे होत आली तरी, कामाने गती पकडल्याचे दिसत नाही. काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. अद्याप एकाही स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही. कामाची मुदत जून 2027 पर्यंत आहे. कामाची ही गती कायम राहिल्यास मुदतीमध्ये सर्व कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. महामेट्रो प्रशासनाने 2027 अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असा दावा केला आहे. त्यामुळे 2028 ला निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक, कामगार व नोकरदारांना घराजवळील स्टेशनपासून थेट स्वारगेटपर्यंत मेट्रोने ये-जा करता येणार आहे.
महामेट्रोचे कासवगतीने काम
निगडी ते स्वारगेट असा मेट्रो मार्ग हवा असताना, तो पिंपरी ते स्वारगेट असा करण्यात आला. त्यामुळे मध्यवर्ती मार्गावर मेट्रोची अर्धवट कनेक्टिव्ही असल्याने शहरवासीयांमध्ये नाराजीचा सूर होता. अखेर निगडी ते पिंपरी मेट्रो विस्तारीत मार्गाचे काम सुरू करण्यात आले. दुसरीकडे, पुणे शहरात मोठ्या संख्येने मेट्रोचे नवीन मार्गांना मंजुरी दिली जात आहे. त्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरात नवीन मार्गाची संख्या नगण्य आहे. अर्धवट असलेल्या पिंपरी ते निगडी मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. निगडी ते चाकण या नव्या मार्गाचा डीपीआरमध्ये भोसरी मार्गाचा समावेश करून सुधारित डीपीआर लवकरच पालिकेला सादर केला जाणार आहे. नाशिक फाटा ते चाकण मेट्रोचा डीपीआर रद्द करण्यात आला. पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडबाबत दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाहतूक वर्दळीमुळे कामास विलंब
निगडी ते चिंचवडच्या सेंट मदर टेरेसा उड्डाण पूल या मेट्रोचे काम सुरू असलेल्या मार्गावर प्रचंड वर्दळ असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महामेट्रोच्या अवजड वाहनांना ये-जा करणे अडचणीचे ठरत आहे. कर्कश आवाज होत असल्याने रात्रीच्या वेळेत काम करण्यास विरोध असल्याने काम बंद ठेवावे लागते. जोरदार पावसामुळे आणि पाणी साचल्याने अनेकदा काम बंद ठेवावे लागले. वृक्ष तोडण्यास आणि स्थलांतरित करण्यास विरोध झाल्याने काम सुरू करण्यास वेळ गेला. अनेकदा जलवाहिन्या व इतर सेवा वाहिन्या फुटल्याने काम बंद ठेवण्यात आले. तसेच, इतर तांत्रिक कारणांमुळे कामास विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
निगडी ते चिंचवड सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था:
मेट्रोचे काम सुरू असलेल्या निगडी ते चिंचवड या मार्गावरील सर्व्हिस रस्ता खराब झाला आहे. तसेच, बीआरटी मार्ग उद्ध्वस्त झाला आहे. अनेक ठिकाणी बीआरटी थांबे तोडण्यात आले आहेत. धूळ, खड्डे, लोखंडी चेंबर, चढ व उतार, असमान पातळीचे रस्त्यामुळे वाहनचालक वैतागले आहेत. संथ गतीने वाहतूक होत असल्याने वर्दळीच्या वेळेत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वारंवार तक्रार करूनही महामेट्रो व्यवस्थापनाकडून चांगला दर्जाचा रस्ता तयार करण्यात येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काम करताना तेथे छोटे अपघात होत आहेत. मुंबईसारखी दुर्घटना घडू नये, म्हणून तेथील कामाचे सेफ्टी ऑडिट करावे, असे सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले यांनी सांगितले.
2027 पर्यंत काम पूर्ण होईल
पिंपरी ते निगडी मार्गावरील मेट्रोची कामे वेगात पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील वर्षापर्यंत सर्व कामे होतील. आरसीसीचे काम असल्याने कामास गती देण्यात आली आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.