Social Media Survey Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Municipal Election Social Media Survey: महापालिका निवडणुकीआधी सोशल मीडियावरील ‘जनमत सर्वेक्षणांचा’ फार्स

इच्छुकांचा आभासी जल्लोष; खासगी एजन्सींच्या सर्वेक्षणांना प्रशासनाने नाकारले महत्त्व

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होत आहे. असे असताना ऑनलाईन सोशल मीडियावर इच्छुकांकडून आपल्या प्रभागात जनमताचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणात पसंती मिळाल्यानंतर नगरसेवक झाल्याच्या थाटात अक्षरश: जल्लोष केला जात आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात जनमत सर्वेक्षणाच्या आकडेवारीतील समीकरणाच्या आधारे काही खासगी एजन्सी इच्छुकांकडून मोठा आर्थिक मोबदला लाटत असल्याची माहिती मिळत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्रभागरचना, आरक्षण सोडत अंतिम झाली आहे. प्रभागनिहाय मतदार यादी सोमवारी (दि.15) अंतिम केली जाणार आहे. तसेच, सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांकडून प्रभागात प्रचाराचा धुराळा उडवत आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह सहली व देवदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. शहराध्यक्षांसह खासदार, आमदार व वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

खासगी एजन्सी तसेच, समर्थकांकडून इच्छुकांचे वेगवेगळ्या प्रकारे बॅण्डींग करण्यात येत आहे. त्यासाठी या जनमताचे सर्वेक्षणाचा आधार घेतला जात आहे. सर्व इच्छुकांमध्ये आपण कसे सरस, मतदारांची आपल्यालाच सर्वाधिक पसंती, हे दाखविण्यासाठी खटाटोप सुरू आहे. प्रभागातील दहा ते पंधरा इच्छुकांच्या नावांची यादी सोशल मीडियावर टाकली जाते. तुम्ही कोणाला मत देणार, तुमची सर्वाधिक पसंती कोणाला, असे विविध प्रश्नांची यादी करून एका नावापुढे पसंती दर्शविण्यास सांगितले जाते. सर्वाच्या हातात मोबाईल असल्याने नागरिक आवडत्या इच्छुकाला पसंती देत आहेत.

ज्या इच्छुकांच्या नावापुढे अधिक पसंती मिळते, तो इच्छुक आणि त्याचे समर्थक अक्षरश: नगरसेवक म्हणून निवडून आल्याच्या थाटात जल्लोष करत आहेत. ‌‘आपल्यासमोर सर्व फिके...‌’, ‌‘दादा‌’, ‌‘भाऊ‌’, ‌‘अण्णा‌’, ‌‘ताई‌’, ‌‘वहिनी‌’, ‌‘आक्काच भावी नगरसेवक‌’, ‌‘प्रभागाचा एकच दावा‌’, ‌‘आपलं काम बोलतंय‌’, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल करून धुमाकूळ घातला जात आहे. त्यावर तुम्हीच, यंदा फिक्स नगरसेवक, पुन्हा नगरसेवक अशा आपल्या इच्छुकांच्या समर्थनार्थ कमेंट पोस्ट केल्या जात आहेत. त्यावरुन प्रभागात आपणच कसे योग्य हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इच्छुकांचा या प्रकारे प्रचार करण्यासाठी खासगी एजन्सीकडून हा फंडा राबविला जात असल्याचे जाणकारांनी सांगितले. त्यासाठी एजन्सी आर्थिक मोबदला लाटत असल्याचे दिसत आहे.

मात्र, प्रत्यक्षात प्रमुख पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते. कोणाचा अर्ज बाद होतो. कोण निवडणुकीतून माघार घेतो. त्यावरून प्रभागातील चार जागेवरील लढत स्पष्ट होणार आहे. सर्वेक्षणातील अनेक इच्छुक प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातून गायब होण्याची शक्यता असते. सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो. असे सोशल मीडियावर जनमत चाचणी घेऊन कोणी निवडून येत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. प्रभाग पिंजून काढावा लागतो, असे काही अनुभवी माजी नगरसेवकांनी सांगितले.

प्रभागाबाहेरील नागरिक घेतात सहभाग

सोशल मीडियाच्या सर्वेक्षणात केवळ प्रभागातील नागरिक सहभागी होत नाहीत. तर, पिंपरी-चिंचवड शहरासह इतर भागांतील नागरिक त्या सर्वेक्षणात सहभागी होतात. त्यामुळे प्रभागाशी संबंध नसणारे नागरिक जनमताचा कौल देतात. तसेच, मतदार यादी नाव नसलेले नागरिक व तरुणही पसंती देतात. त्यामुळे हे सर्वेक्षण केवळ फार्स असल्याचे दिसून येत आहे.

अशा सर्वेक्षणास काही अर्थ नाही

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आचारसंहिता अद्याप जाहीर झालेली नाही. त्यापूर्वी इच्छुकांकडून सोशल मीडियावर जनमत चाचणीसह वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांचा कौल घेतला जात आहे. या जनमत चाचणीस कोणताही अर्थ नाही. केवळ प्रचाराच्या हेतूने असे प्रकार केले जात असावेत, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT