पिंपरी: पिंपरीतून मेट्रोसेवा गेल्या पावणेचार वर्षांपासून सुरु आहे; मात्र पिंपरी मेट्रो स्टेशन येथील कमला क्रॉस व्यापारी संकुलासमोरील चौथ्या जिन्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे. पिंपरीबाजूने येणाऱ्या प्रवाशांना मेट्रोसाठी मोरवाडी चौक ओलांडावा लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो 6 मार्च 2022 पासून नागरिकांच्या सेवेत आली आहे. त्यानंतर फुगेवाडीपासून पुण्यातील जिल्हा न्यायालयापर्यंत मेट्रो धावण्यास 1 ऑगस्ट 2023 पासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड व पुणे शहर मेट्रोने जोडले गेले. पिंपरी स्टेशन येथून मेट्रोने ये-जा करण्यास मोठी पसंती दिली जात आहे. महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांही मेट्रोने प्रवास करतात. मोरवाडी चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे चौकात वारंवार वाहतूक कोंडी होते.
दरम्यान पिंपरीहून येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रोकडून चौथ्या जिन्याचे काम कमला क्रॉस या व्यापारी संकुलासमोर सुरू करण्यात आले. ते काम संथ गतीने सुरू आहे. कामाच्या ठिकाणी या ठिकाणी राडारोडा पडल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा जिना लवकरात लवकर प्रवाशांसाठी खुला करण्याची मागणी केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अर्बन स्ट्रीट अंतर्गत पदपथ सुभोभीकरणाचे कामही सुरु आहे. त्यातच मेट्रो स्टेशनच्या चौथा जिन्याचे कामही अपूर्णच असल्याने वर्दळीचा रस्ता अरुंद झाला आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना मोठे त्रासदायक ठरत आहे.
पिंपरी मेट्रो जिन्याचे काम पूर्ण झाले असून, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा जिना प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी बाजूकडून येणाऱ्या प्रवाशांना स्थानकात ये-जा करणे सोयीचे होईल.चंद्रशेखर तांबवेकर जनसंपर्क आधिकारी, पुणे मेट्रो