Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Contract Worker Death: रोषणाईच्या माळा काढताना गच्चीवरून पडला; पिंपरीत कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

कासारवाडीतील महापालिका इमारतीवरील दुर्घटना; सुरक्षा साधनांशिवाय काम सुरू असल्याचा आरोप, ठेकेदारावर कारवाईची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील महिला आयटीआय इमारतीमध्ये ह क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. त्या इमारतीवरील विद्युत रोषणाईच्या माळा काढताना गच्चीवरून पडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

राहुल साबळे (43, रा. विजयनगर, काळेवाडी) असे त्या कर्मचार्‍याचे नाव आहे. एक मजली असलेल्या ह क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ते काम ठेकेदार राम इंगळे यांच्या पार्वती इलेक्ट्रिक्सला देण्यात आले होते. रोषणाईच्या माळा काढण्याचे काम ठेकेदाराने मंगळवारी (दि.18) दुपारी सुरू केले. त्यासाठी ठेकेदाराने चार कर्मचारी नेमले होते. विद्युत प्रवाह बंद असलेल्या माळा काढण्याचे काम करता असताना कर्मचारी राहुल साबळे हा इमारतीच्या गच्चीवरून खाली पडला. ही घटना दुपारी दीड ते दोनच्या सुमारास घडली.

त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. दरम्यान, कर्मचार्‍यांनी कोणतेही सुरक्षा साधने जसे की, हेल्मेट, बूट, पोशाख, दोरखंड आदींचा वापर केला नव्हता. सुरक्षा साधने नसताना कर्मचारी इमारतीवरील माळा काढण्याचे काम जीव धोक्यात घालून करत होते. सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने नाहक कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याने शहरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सुरक्षा उपकरणांकडे दुर्लक्ष करत काम

कोणतेही काम करताना सुरक्षा उपकरणे वापरणे हा नियम आहे. मात्र, ठेकेदार त्या गोष्टीकडे कानाडोळा करतात. ठेकेदार तसेच, कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच, संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना घडून कर्मचार्‍यांचे नाहक मृत्यू होत आहेत. महापालिकेकडून कामाची बिल काढली जातात. मात्र, सुरक्षासाधने घालण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने दुर्घटना घडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातून महापालिका प्रशासन कोणताही धडा घेत नसल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

ठेकेदाराकडून कामाबाबत पूर्वकल्पना नाही

पार्वती इलेक्ट्रिक या ठेकेदार एजन्सीने विद्युत विभागाची पूर्वपरवानगी न घेता ह क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीवरील रोषणाईच्या विद्युत माळा काढण्याचे काम सुरू केले होते. ते काम चार कर्मचारी करत होते. त्यात इमारतीवरून एक कर्मचारी खाली पडून मृत्यू पावला. यासंदर्भात आयुक्तांना अहवाल दिला आहे. त्यांच्या सूचनेनुसार ठेकेदारावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता महेश कावळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT