पिंपरी: स्वातंत्र्यदिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त पिंपरी बाजारपेठेत तिरंगी झेंडे आणि सजावटीचे सामान मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाले आहे. दुकानाच्या बाहेर लावलेले तिरंगी झेंडे, झुरमुळ्या, बॅच खरेदीसाठी लावल्याचे दिसून येत आहे. पिंपरी तसेच शहरातील बाजापेठा स्वातंत्र्य दिनाच्या तयारीसाठी लागणाऱ्या साहित्याने सजून गेल्या आहेत.
यंदाच्या बाजारपेठेतील प्रमुख आकर्षण म्हणजे पोशाखावर लावले जाणारे छोटे झेंडे. लहान आकारातील कागदी, कापडी व मेटलचे झेंडे उपलब्ध आहेत. त्याला ग्राहकांची मोठी पसंती आहे. सजावट करण्यासाठी विविध प्रकारच्या आकर्षक कागदी पताका बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
झेंड्याचे कटाऊट, रंगीत कागदी फुले ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याबरोबरच खादीचे कपडे, टोपी, तिरंग्याची थीम असणारे जॅकेट्स, टी-शर्ट, ओढण्या अशा कपड्याच्या खरेदीसही ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. त्यातही कुर्ता, पायजमा किंवा पांढर्या कुर्त्याला बाजारपेठेमध्ये सर्वाधिक मागणी आहे.
शाळा-कॉलेजात जय्यत तयारी
स्वातंत्र्य दिनासाठी शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पीटी, शौर्यगीत, लेझीम, बँड, पथ संचलन अशा विविध कार्यक्रमांच्या रंगीत तालमींनी सगळीकडे चैतन्याचे वातावरण आहे.स्वातंत्र्य दिनासाठी शाळेची स्वच्छता, वर्गांची सजावट, विविध साहित्यांची दुरुस्ती, विविध पथकांची संचलनाची तयारी अशा प्रकारे संपूर्ण परिसरामध्ये प्रसन्न वातावरण असते.
विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही तेवढ्याच उत्साहाने या सर्वांमध्ये सामाविष्ट होत असतात. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध शाळांमधून काढल्या जाणार्या प्रभात फेरी यांचे सर्वांनाच विशेष आकर्षण असते. पारंपरिक वेशभूषेमध्ये लेझीम, ढोल ताशांसह विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असतात. झेंडा वंदनासह विविध स्पर्धांचे आयोजनही या निमित्ताने करण्यात येते.