पिंपरी: कासारवाडी परिसरातील पदपथावर बेकायदेशीरपणे दोन देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 22) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली.
यश नंदकिशोर कांबळे (19, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) व अथर्व सुनील भोकरे (21, रा. नवी सांगवी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिस हवालदार प्रवीण पाटील यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कासारवाडी ते भोसरी-सांगवी ओव्हर बिजदरम्यान आरोपी संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. झडती घेतली असता त्यांच्याकडे 1 लाख 31 हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे आणि दोन रिकामे मॅगझीन आढळले. फौजदार पवळे तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त
पिंपरी बिज परिसरातील शिवशंकर मंदिराजवळ पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. ही कारवाई बुधवारी (दि. 22) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास करण्यात आली. पप्पीसिंग (वय 35, रा. उमरटी, मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस शिपाई रोहित वाघमारे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलाला पिस्तूल बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून, त्याने पिस्तूल व काडतूस आरोपी पप्पीसिंग याच्याकडून आणल्याचे कबूल केले. सहायक पोलिस निरीक्षक अतिग््रेा तपास करीत आहेत.