पिंपरी: राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेचा निकाल 2 मे रोजी घोषित करण्यात आला. दुसऱ्याच दिवशी 3 मे रोजी विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे बारावीच्या निकालाचा परिणाम नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीवर होण्याची शक्यता शिक्षणतज्ञ व समुदेशक यांनी वर्तवली आहे. यामुळे पालक-विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील नीटच्या निकालात मोठी घसरण होऊन असंख्य मुलांच्या पर्सेंटाईलवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. बारावीचा निकाल एक दिवस पुढे ढकलण्यासाठी पालक, तज्ज्ञांनी मागणी करुनही मंडळ ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. मंडळाच्या या आढमुठेपणामुळे राज्यातील नीटच्या निकालात मोठी घसरण होवून असंख्य विद्यार्थ्यांच्या पर्सेंटाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्यातील मुलांना पर्सेंटाईल कमी पडले अथवा निकाल घसरला, त्यासाठी राज्य शिक्षण मंडळ आणि शालेय शिक्षण विभाग जबाबदार असेल, अशा प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत. निकालानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच नीटची परीक्षा घेतल्यामुळे मानसिक ताण घेवून विद्यार्थ्याचा परीक्षेतील गुणवत्तेवर परिणात होवू शकतो. बारावीचा निकाल आणि नीटची परीक्षा यामध्ये साधारणत: आठ ते दहा दिवसाचा गॅप असणे गरजेचे होते. नीट परिक्षेच्या आदल्या दिवशी निकाल लावण्याचा निर्णय निश्चितच संबंधित विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनावर ताण आणणारा ठरू शकतो. याबाबत राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.
विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडली ?
माझा मुलाने बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, निकालाच्या दुसऱ्या दिवशी नीटची परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडली. नीटची परीक्षा घेवून बारावीचा निकाल एक किंवा दोन दिवसांनी लावला असता तरी चालले असते. यंदा हुशार मुलांचे गुण देखील कमी आले आहेत. तर काही सर्वसामान्य मुलांना देखील काळजी वाटत आहे, असे एका पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
राज्यातील नीटच्या निकालात मोठी घसरण होऊन असंख्य मुलांच्या पर्सेंटाईलवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांच्यावर शालेय शिक्षण मंत्री यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी आम्ही मागणी केली आहे. अन्यथा सर्व विद्यार्थी संघटना सोबत घेऊन राज्य शिक्षण मंडळास घेराव घालण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.अमर एकाड, (अध्यक्ष, केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिशन (कॉप्स) महाराष्ट्र राज्य)
नीट परीक्षा ही विद्यार्थ्याच्या करिअरची दिशा ठरविणारी महत्त्वाची परीक्षा आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर 24 तासांच्या आत विद्यार्थ्याना नीटची परीक्षा द्यावी लागते. हे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला धक्का पोहचविणारे आहे. नीटची परीक्षा झाल्यानंतर निकाल जाहीर केला असता तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य ठरले असते. राज्या शासनाकडून काही सूचक आदेश आले असताना देखील त्याला न जुमानता राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी, अट्टहासाने निकाल जाहीर केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. दोन्ही निकालामध्ये निदान आठवड्याचे तरी अंतर हवे होते.महेंद्र गणपुले (ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ)
निकालाची एवढी घाई का केली हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. त्यामुळे काही मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होवून त्याचा परिणाम परीक्षेवर देखील नक्कीच झाला आहे.रामदास झोळ (संस्थापक, असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्युशन महाराष्ट्र राज्य)