Hariyal Bird Death Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Pollution Hariyal Bird Death: पिंपरीत राज्यपक्षी हरियाल मृतावस्थेत; उष्णता व प्रदूषणाचा घात

ताथवडे परिसरातील घटनेने पर्यावरणाचा इशारा; दूषित पाण्यामुळे पक्ष्यांचा जीव धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल मृतावस्थेत आढळला. ‌‘वर्ल्ड फॉर नेचर‌’ संस्थेचे सदस्य स्वप्नील पवार आणि सोमनाथ घुंगुर्गे यांना हा पक्षी मृतावस्थेत आढळून आला. प्राथमिक निरीक्षणानुसार, तीव उष्णता आणि पाण्याअभावी या पक्ष्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, या परिसरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर नदी असूनही हरियाल आपली तहान भागवू शकला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नदीतील वाढते प्रदूषण. औद्योगिक सांडपाणी, रासायनिक घटक आणि घातक कचऱ्यामुळे नदीचे पाणी दूषित बनले आहे. ज्यामुळे पक्षी व प्राण्यांसाठी ते पिण्यायोग्य राहिले नसल्याचे वर्ल्ड फॉर नेचरचे शुभम पांडे यांचे म्हणणे आहे.

उन्हाच्या तीवतेमुळे नागरिकही हैराण झाले आहेत. त्यातच आता पक्ष्यांनाही उष्णतेचा त्रास होत आहे. पक्ष्यांचे प्राण वाचवण्यासाठी पक्षी रक्षक आणि स्वयंसेवक प्रयत्न करत आहेत. मात्र, पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळणे अवघड झाले आहे.

हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी असून तो प्रामुख्याने जंगल भागात आढळणारा आणि फळांवर उपजीविका करणारा पक्षी आहे. याची ओळख त्याच्या हिरव्या रंगाच्या शरीरामुळे आणि पिवळ्या पायांमुळे होते. हा पक्षी स्वच्छ पाणी व सुरक्षित अधिवासाच्या ठिकाणी आढळून येतो.

गेल्या काही वर्षांपासून शहरातील नद्यांचे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे केवळ जलचरच नव्हे, तर पक्षी आणि इतर वन्यजीवदेखील धोक्यात आले आहेत. पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने अनेक पक्षी मानवी वस्तीत येऊन पाण्याचा शोध घेतात, आणि अशा परिस्थितीत उष्माघात किंवा विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू होतो.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, नदी स्वच्छता, पाण्याचे स्रोत जपणे आणि शहरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांनी आपल्या घराजवळ किंवा गच्चीवर पाण्याची भांडी ठेवून पक्ष्यांना मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचा राज्यपक्षी अशा प्रकारे मृतावस्थेत सापडणे ही वेदनादायी बाब असून प्रशासन आणि नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. अन्यथा, पर्यावरणातील असंतुलनामुळे भविष्यात अशा घटना अधिक प्रमाणात घडण्याची भीती आहे.
शुभम पांडे ( संस्थापकीय अध्यक्ष, वर्ल्ड फॉर नेचर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT