Pimple Gurav Traffic Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Gurav Traffic Issue: पिंपळे गुरवमधील राजमाता जिजाऊ उद्यान चौक वाहतूक व सुरक्षेचा हॉट स्पॉट

पदपथांवरील अतिक्रमण आणि पार्किंगअभावी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान परिसरातील मुख्य चौक सध्या वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या दृष्टीने हॉट स्पॉट बनला आहे. सांगवी, पिंपळे गुरव व कल्पतरू परिसराकडे जाण्यासाठी हा चौक अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा असताना याच ठिकाणी पदपथांवर पथारी व्यावसायिक व हातगाडीवाल्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. परिणामी पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राजमाता जिजाऊ उद्यान हे परिसरातील नागरिकांसाठी व्यायाम, विरंगुळा व कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. विशेषतः शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, या वाढत्या गर्दीच्या तुलनेत परिसरात कोणतीही नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. उद्यानालगतचा हा चौक मुख्य वाहतूक मार्ग असल्यामुळे येथे दिवसभर दुचाकी, चारचाकी व रिक्षांची मोठी वर्दळ असते. पार्किंगच्या अभावामुळे उद्यानात येणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर दुचाकी, चारचाकी वाहने तसेच रिक्षा रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभा करून उद्यानात जातात. यामुळे चौक व रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

त्यातच दोन्ही बाजूंनी पदपथांवर पथारी व हातगाड्यांचे अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांसाठी चालण्यास जागाच उरलेली नाही. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना थेट रस्त्यावरूनच चालावे लागत असून, दुचाकी, चारचाकी व रिक्षांच्या गर्दीत त्यांचे प्राण धोक्यात येत आहेत. अचानक ब्रेक लागणे वाहनांची एकमेकांना धडक तसेच किरकोळ अपघातांच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पदपथ पादचाऱ्यांसाठी असतो की व्यावसायिकांसाठी असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ही परिस्थिती महापालिका व संबंधित प्रशासनाला दिसत नाही का? एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

नागरिकांनी सुचविलेल्या उपाययोजना

  • राजमाता जिजाऊ उद्यान परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे.

  • शनिवार व रविवारची वाढती गर्दी लक्षात घेता तात्पुरती अथवा कायमस्वरूपी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

  • मुख्य चौकात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक करावी.

  • नो पार्किंग झोनची काटेकोर अंमलबजावणी करून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी.

  • नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांनी नियम का पाळावेत, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

  • राजमाता जिजाऊ उद्यान परिसरातील वाढती गर्दी पार्किंगचा अभाव आणि पदपथांवरील अतिक्रमण यासाठी नेमकी जबाबदारी कोणाची हे प्रशासनाने स्पष्ट करावे.

नागरिकांच्या जीविताशी खेळ होत असताना केवळ बघ्याची भूमिका न घेता प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत. महापालिकेने उद्यानालगतच्या वाहतुकीच्या रस्त्यावर उभा राहणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करून द्यावी. त्याचे योग्य नियोजन करावे तसेच कोणीही बेशिस्त पद्धतीने वाहन पार्क केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
सुदाम पाचोरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग.
सर्व झोनल कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. फेरीवाले पथक सतत कार्यरत ठेवण्यात येणार आहे. जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना नेमून दिलेल्या जागेत मागे सरकून पदपथ मोकळा करून घेतला जाईल. तसेच जे अनधिकृत फेरीवाले असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग.
पदपथ पूर्णपणे अतिक्रमित झाले आहेत. लहान मुलांना आणि वृद्धांना रस्त्यावरून चालावे लागते. एखादा मोठा अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार का?
राजश्री शिर्के, स्थानिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT