खराळवाडी: आखाती देशात युद्ध सुरू असल्यामुळे पिंपरी शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने 70 टक्के शहरातील हॉटेल, लंचहोम, खानावळी बंद पडल्या आहेत. शिक्षणासाठी व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी उद्योगनगरीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वास्तव्यास आहेत. परंतु सध्या विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात गावी जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरात जेवणाचे दर वाढल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जादा दराने पैसे दिले तरी पोटभर जेवण मिळत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गावाला जातील, अशी भीती उपहारगृह, मेसचालकाने व्यक्त केली आहे.
पिंपरी शहरात स्पर्धा परीक्षाधारक विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी अभ्यासिका चालवल्या जातात. खास करून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ परिसरात चौका चौकांत मोठ्या अभ्यासिका आहेत. गॅसचा पुरवठा नियमित होत नसल्याने हॉटेल, खानावळीवर मोठे संकट उभा राहिले. गॅस मिळत नसल्याने पाहिजे तेवढे जेवण बनवता येत नाही. तसेच काही ठिकाणी जेवणाचे दर वाढवले आहेत. पिंपरी चिंचवड शहराबाहेरील विद्यार्थी मोठ्या संख्येने पिंपरी शहरांतील विविध ठिकाणच्या महाविद्यालयात शिकत आहेत. नागपूर, अमरावती, कोल्हापूर, बीड, जालना, संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
महागाईचा फटका
काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. वाढत्या महागाईने सध्या पिंपरी शहरात राहणे मुळात कठीण झाले आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत भर पडल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. परीक्षेच्या काळात वेळ खूप महत्त्वाचा असतो, परंतु या विद्यार्थ्यांना जेवण मिळत नसल्याने इकडे तिकडे फिरावे लागत आहे. पुढील काही दिवसांत गॅसचा पुरवठा सुरळीत होईल की नाही याची खात्री नसल्याने पुढील आठवडा महत्त्वाचा आहे. या कालावधीत परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी गावी गेल्याशिवाय विद्यार्थ्यांकडे पर्याय शिल्लक राहिलेला नाही.
परीक्षा जवळ आल्याने गावाकडे जाणे योग्य नाही. माजी खानावळ बंद पडल्यामुळे मी माझ्या आत्याकडे जेवायला जातो. त्यामुळे मला अभ्यास करणे सोपे झाले आहे.सुधीर कांबळे, विद्यार्थी.
एमपीएससी, यूपीएससीच्या पुढील काही दिवसांपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत. परीक्षेच्या तयारीत विद्यार्थी मग्न असताना संकट आले आहे. जेवण नसेल तर अभ्यासात विद्यार्थी लक्ष घालू शकत नाही. याची विद्यार्थ्यांना कल्पना आहे. महागाई वाढल्याने शहरात राहणे परवडणार नाही त्यामुळे आठ दिवस वाट पाहून गॅस तुटवडा कमी होईल, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. दररोज विद्यार्थी गावाकडे जात आहेत. ही परिस्थिती सुधारली नाही तर अभ्यासिका बंद पडतील.गणेश कांबळे, ग््रांथपाल
शहरातील उपहारगृहे, खानावळी बंद असल्याने पारलेजी बिस्किटे, चिप्स खाऊन भूक भागवावी लागत आहे. नाश्ता सेंटर बंद असल्याने भजीपाव, मिसळ मिळत नाही. काही मैत्रीणी येथे राहत असल्याने त्या माझ्यासाठी जेवण आनतात.अंजली सिनगारे, विद्यार्थिनी