पिंपरी: अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात भक्तिमय आणि जल्लोषाचे वातावरण होते. मात्र, या उत्सवाची शिस्त अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाने तब्बल सतरा तास खडा पहारा ठेवत कायदा व सुव्यवस्थेची धुरा समर्थपणे पेलली.
सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेला बंदोबस्त मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहिला. शेवटची मिरवणूक रात्री 1 वाजून 57 मिनिटांनी संपली. किरकोळ अपवाद वगळता संपूर्ण विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडली. (Latest Pimpri News)
959 मंडळांच्या मूर्ती विसर्जित
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हद्दीत एकूण 2,146 गणेशोत्सव मंडळे नोंदणीकृत आहेत. यापैकी पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी अनेक मंडळांचे विसर्जन झाले. मात्र, अनंत चतुर्दशीला 959 मंडळांनी गणेशमूर्ती विसर्जित केल्या. विशेषतः पिंपरी, चिंचवड व निगडी भागातील घाटांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. सांगवीतील बरीच मंडळे सातव्या दिवशी विसर्जित झाल्याने अंतिम दिवशी तिथे गर्दी तुलनेने कमी होती.
पोलिसांचा मोठा फौजफाटा
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तब्बल चार हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी व अधिकारी तैनात होते. यामध्ये पोलिस सहआयुक्त, अपर पोलिस आयुक्त, सहा उपायुक्त, 9 सहायक आयुक्त, 64 निरीक्षक, 291 उपनिरीक्षक, 2 हजार 355 अंमलदार, 400 होमगार्ड, 2 एसआरपीएफ प्लाटून, 17 स्ट्रायकिंग फोर्स, सहा आरसीपी प्लाटून व एक बीडीडीएस पथकाचा समावेश होता. घाटांवर टेहळणीसाठी टॉवर उभारण्यात आले होते. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून थेट नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले होते.
वाहतुकीत बदल; होमगार्डची मदत
शहरातील 39 मिरवणूक मार्गांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी स्वतंत्र नियोजन केले होते. प्रमुख चौकांमध्ये अधिकारी, उपनिरीक्षक व 100 होमगार्ड यांची अतिरिक्त नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही वाहतूक तुलनेने सुरळीत राहिली.
धार्मिक स्थळांवर विशेष लक्ष
मिरवणुकीच्या मार्गावरील मंदिर, मशीद, दरगाह, मठ या धार्मिक स्थळांभोवती अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. संवेदनशील ठिकाणी अधिकारी स्वतः थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. साध्या पोशाखातील पोलिस गर्दीत सतत फिरत होते. धार्मिक सौहार्द अबाधित ठेवण्याचे आवाहनही पोलिसांनी केले.
ड्रोन व सीसीटीव्हींद्वारे निरीक्षण
या वर्षी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. सीसीटीव्ही फूटेज थेट नियंत्रण कक्षात पोहोचत होते. ड्रोन कॅमेर्यांद्वारे वरून गर्दीची स्थिती पाहण्यात आली. संशयास्पद हालचाली अथवा आपत्कालीन परिस्थितीची त्वरित माहिती नियंत्रण कक्षाला मिळत होती, त्यामुळे पोलिसांना लगेचच प्रतिसाद देता आला.
सोशल मीडियावर लक्ष
सायबर विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून होता. अफवा किंवा आक्षेपार्ह संदेशांचा त्वरित बंदोबस्त करण्यात आला. अग्निशमन दलाचे पथक, अॅम्ब्युलन्स व वैद्यकीय टीम सतत सज्ज होत्या. त्यामुळे कोणत्याही अपघातात किंवा आगीच्या घटनांमध्ये तातडीने मदत पोहोचवणे शक्य झाले.
विसर्जन घाटावर पोलिसांचा वॉच
शहरातील तब्बल 73 विसर्जन घाट पोलिसांनी महत्त्वाचे निश्चित केले होते. या घाटांवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित राहून पाहणी करत होते. हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी संवेदनशील घाटांवर बंदोबस्त ऐनवेळी दुप्पट करण्यात आला होता.
महिलांच्या सुरक्षेसाठी पथकांची गस्त
महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक घाटावर महिला पोलिस पथक तैनात करण्यात आले होते. साध्या वेशातील महिला अधिकारी सतत गस्त घालत होत्या. महिलांसाठी तक्रार बूथ कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे छेडछाड किंवा असभ्य वर्तन झाल्यास पोलिसांना हस्तक्षेप करणे शक्य झाले.
विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी चोख नियोजन केले होते. परिणामी किरकोळ अपवाद काही अनुचित प्रकार घडला नाही. रात्री दोनच्या सुमारास बंदोबस्त संपवण्यात आला.- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी- चिंचवड