

तळेगाव दाभाडे: गणेशोत्सव हा केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळा नसून, तो स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना देणारा उत्सव ठरला आहे. देशभरात यंदा गणेशोत्सवामुळे तब्बल 30 हजार कोटींचा व्यापार झाल्याची आकडेवारी सीएआयटीने समोर आणली असताना, मावळ तालुक्यातील बाजारपेठांमध्ये यंदा लक्षणीय उलाढाल झाल्याचे चित्र समोर आले आहे. गणेशोत्सवात मावळात 25 कोटींवर उलाढाल झाल्याने सर्वांना बाप्पा पावले... असे आनंदाचे वातावरण आहे.
तळेगाव, लोणावळा, कामशेत, वडगाव बाजारपेठा केंद्रस्थानी
तळेगाव दाभाडे शहर व परिसरात सर्वांधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत येथे 7 ते 8 कोटींची उलाढाल झाली असल्याचा कयास व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी लावला आहे. संपूर्ण मावळ तालुक्याची एकूण उलाढाल 25 कोटींपर्यंत गेल्याचा अंदाज जाणकार व्यापार्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना वर्तवला आहे. (Latest Pimpri News)
यात वस्त्र खरेदी, गणेशोत्सवासाठी वापरात येणारे साहित्य, मूर्ती, पूजा साहित्य, फुले, मिठाई, ज्वेलरी, सोने-चांदीचे दागिने, वाहन खरेदी, मंडप, डीजे, ढोल पथके, केटरिंग व डेकोरेशन यांचा मोठा वाटा आहे. यामुळे मेहनती कामगार मजुरांनाही चांगला रोजगार मिळाला आहे.
रोजगाराला मिळाली चालना
गणेशोत्सव आणि गौरी सणामुळे कारागीर, मूर्तिकार, मजूर, प्रिंटींग प्रेस, ग्राफिक डिझायनर्स, फोटोग्राफर, पेंटर्स, व्हिडिओग्राफर्स आणि तंत्रज्ञ यांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे अनेकांना हंगामी उत्पन्नाचा आधार मिळाला आहे. गेल्या 15 दिवसांत प्रत्येक मजूर कारागिराला 15 ते 20 हजार रुपये मेहनताना मिळाल्याने ते समाधानी आहेत.
ढोल-ताशा पथकांना सव्वा-कोटींचे मानधन
मावळात सुमारे 180 ढोल-ताशा पथके आहेत. त्यापैकी 40 ते 50 पथकांना पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कोकण तसेच जिल्ह्यातील बड्या गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत वाजविण्याची मोठ्या रक्कमेचे मानधन दिले हे. याची सरासरी रक्कम दीड ते दोन लाखांच्या घरात असल्याचे ढोल-ताशा मंडळांच्या संयोजकांनी सांगितले.
तालुक्याबाहेर गेलेल्या या पथकांना सुमारे 70 ते 75 लाख रुपयांची कमाई झाली आहे. तर इतर छोट्या-मोठ्या 70 पथकांना सरासरी 51 हजारांपर्यंत सुपारी मिळाली. यातून त्यांना 30 ते 35 लाख रुपयांची कमाई झाली आहे. इतर भागांतील नामांकित ढोल-ताशा पथकांना तळेगाव दाभाडे येथे पाचारण करण्यात आले होते. यामुळे मावळातील ढोल-ताशा पथकांची एकूण कमाई तब्बल एक ते सव्वा कोटी रुपयांपर्यंत गेल्याने संयोजकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मंदीतून मिळाला दिलासा
गेल्या दोन-तीन वर्षांपासून मॉल संस्कृतीमुळे तळेगाव दाभाडे परिसरातील स्थानिक बाजारपेठा मंदावल्या होत्या. मात्र, यंदा गणेशोत्सव काळात झालेल्या मोठ्या खरेदीमुळे अनेक स्थानिक दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: कापड आणि किराणा व्यापार्यांचा व्यवसायपुन्हा तेजीत आल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले.
तळेगाव दाभाडेतील बड्या मंडळांचा खर्च - 2.5 कोटी
घरगुती गणपती गौराई - 1 कोटी 80 लाख
वडगाव मावळ येथील 35 मंडळांचा खर्च - 70 लाख
लोणावळा 27 मंडळांचा खर्च - 90 लाख
देहूरोड 25 मंडळे - 20 लाख
कामशेत परिसर मंडळांचा खर्च - 25 लाख
ग्रामीण भागातील 16 हजार घरगुती गणेशोत्सव खर्च - एक कोटी 60 लाख
मावळातील नामांकित 40 ढोल-ताशा पथकांची बिदागी - 70 लाख
तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरातील वाढते नागरिकरण पाहाता गणेशोत्सवात मोठी रोजगार निर्मिती झाली आहे. सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गौराई-गणपतीची दोन ते तीन हजार संख्या पाहता शहरात 5 ते 6 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. बड्या मंडळांची उलाढाल दोन ते अडीच कोटी तर घरगुती खरेदी एक कोटी ऐंशी लाखांच्या आसपास झाल्याचे अपेक्षित आहे. शहर आणि परिसरात छोट्यामोठ्या शंभरावर मंडळांना प्रत्येकी किमान 2 लाख रुपयांचा खर्च केला असावा.
- इंदरमल ओसवाल, माजी अध्यक्ष, तळेगाव दाभाडे व्यापारी असोसिएशन
तालुक्यात 150 ते 180 ढोल-ताशा पथके आहेत. त्यांपैकी 45 पथके पूर्ण वेळ वर्षभर सुरू असतात. शिवली गावात अशी 16 पथके आहेत. यंदा आम्हाला 12 लाख 50 हजार रुपयांचे मानधन मिळाले आहे. पवनानगर पट्ट्यात आणि अंदर मावळात आदिवासी, शेतकरी यांची पथके आहेत. यंदा दहा दिवसांत खर्च वजा जाता पथकातील प्रत्येकाला 30 ते 40 हजार रुपये मिळावेत, असा प्रयत्न आहे.
- आनंदा येवले, मुख्य संयोजक, भैरवनाथ ढोल-पथक मंडळ, शिवली
सीएआयटी आणि इतर आर्थिक निरीक्षण संस्थांच्या स्रोतांनुसार 2025 च्या गणेशोत्सवामुळे देशात सुमारे 30,000 कोटींचा व्यापार झाला आहे. त्यात सण उत्सवातील खरेदी विक्रीच्या वस्तूंचा समावेश आहे. मावळात सुमारे 21 ते 24 हजार घरगुती गणपती, गौराई असून सरासरी किमान दहा हजार रुपये खरेदीची रक्कम आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था आणि आस्थापना यांचा एकत्रित विचार केल्यास मावळात या काळात या उत्सवाची उलाढाल 25 ते 30 कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. त्यात शहरी बाजारपेठांमध्ये 70 टक्के व्यवहार झाले आहेत. आर्थिक चलनवलनामुळे व्यापार्यांसह कष्टकरी रोजगारही उपलब्ध झाला आहे.
- डॉ. दत्तात्रेय बाळसराफ, सोशियो-इकॉनॉमिक्स तज्ज्ञ