पिंपरी: लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी अवघ्या आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला असून, भक्तांना आगमनाचे वेध लागले आहेत. त्यामुळे बाप्पाच्या सजावटीसाठी वेगळा पर्याय शोधणार्या भक्तांसाठी आता कापडी अन् प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत.
गणपती आले की मूर्तीसाठी सजावट आलीच. पूजेसाठी सामानाची जुळवाजुळव करावी लागते. यामध्ये फुले, आंब्यांची पाने, जास्वंदीची फुले, विड्याची पाने तर हमखास हवीतच; तसेच दररोज कामामुळे ताजी फुले आणण्यास जमत नाही.
यावर पर्याय म्हणून बाजारात आणि ऑनलाईनदेखील कापडापासून बनविलेल्या केळीची पाने, विड्याची पाने, जास्वंदीची फुले, आंब्याची पाने उपलब्ध आहेत. सणासुणदीच्या काळात निर्माल्य कुठे टाकायचे, हा प्रश्न असतो. या वस्तूंमुळे निर्माल्याचा प्रश्न निर्माण होत नाही. कारण या वस्तू धुता येऊ शकतात. तसेच दिसायलाही हुबेहूब खर्याखुर्या फुलांपानांसारखी दिसतात.
एकदा वापरल्यानंतर या धुवून पुन्हा वर्षभरातील इतर सणावारांसाठी वापरता येतात. तसेच दुकानामध्ये प्लॅस्टिकच्या माळादेखील उपलब्ध आहेत. यांचा इतरही काळात वापर करता येतो. त्यामुळे ग्राहकांचा या गोष्टी घेण्याकडे कल दिसून येत आहे.
कापडी, प्लास्टिकची फुले
गणपती सजावटीसाठी विविधरंगी फुले बाजारात उपलब्ध झाली आहेत. तसेच विविध प्रकारची तोरणेदेखील पहायला मिळत आहे. कागदी, कापडी व प्लॅस्टिकची फुले ही पुन्हा वापरता येण्यासारखी असल्याने ग्राहकांची पसंती आहे. सण म्हटला की तोरण लावले जाते. यासाठी तोरणेदेखील विक्रीस आली आहेत. पिंपरी बाजारात रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.