Pimpri Flyover Safety Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Flyover Safety: पिंपरीतील फ्लायओव्हर धोक्याच्या छायेत; काँक्रीटच्या भिंतींना वड-पिंपळांचा विळखा

लटकते ड्रेनेज पाइपही अपघाताला निमंत्रण; संरचनात्मक सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहरातील अनेक प्रमुख रस्ते आणि महामार्गांवरील फ्लायओव्हरच्या भिंतींवर वड-पिंपळाची झाडे उगवून चांगलीच मोठी झाली आहेत. मातीच्या कुंडीत नव्हे, तर थेट काँक्रीटच्या भिंतीत रुजलेली ही झाडे आता संरचनेच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत.

त्यातच फ्लायओव्हरवरील पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या काही पाइपलाइन तुटलेल्या अवस्थेत धोकादायकरीत्या लटकताना आढळून आल्या आहेत. वादळी वारे आल्यास हे पाइप खालून जाणाऱ्या दुचाकीस्वार अथवा वाहनांवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँक्रीटमध्ये रुजलेली मुळे आणि लटकते पाइप अशा दुहेरी धोक्याच्या छायेतून वाहनचालकांची वाटचाल सुरू असल्याचे समोर आले आहे.

काँक्रीटला मुळांचा विळखा

वड आणि पिंपळाची झाडे भेगा, फटी आणि संरचनेतील छोट्या जागांमध्येही सहज रुजतात. सुरुवातीला छोटे रोप दिसते. मात्र, कालांतराने त्याची मुळे विस्तारत जाऊन भिंतींवर दबाव निर्माण करू शकतात. काही ठिकाणी झाडांचे खोडही मोठे झाल्याचे दिसत आहे.

भिंतींना तडे, टाईल्सही निखळल्या

फ्लायओव्हरच्या भिंतींवर तडे जाणे, संरक्षणात्मक टाईल्स निखळणे आणि काँक्रीटचा भाग खराब होणे अशा समस्या काही ठिकाणी दिसून येत आहेत. या नुकसानीमागे झाडांची मुळे कारणीभूत आहेत का, याची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक आहे.

लटकत्या पाइपमुळे अपघाताचा धोका

फ्लायओव्हरवरील पावसाचे पाणी खाली वाहून नेण्यासाठी बसविण्यात आलेल्या पाइपलाइनपैकी काही पाइप तुटून धोकादायक पद्धतीने लटकताना आढळून आले आहेत. हे पाइप मजबूतपणे बांधलेले नसतील किंवा वादळी वाऱ्याचा तडाखा बसला तर ते थेट खाली जाणाऱ्या दुचाकीस्वार अथवा वाहनांवर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडांच्या मुळांमुळे संरचनेला संभाव्य धोका असतानाच लटकत्या पाइपमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित यंत्रणेने अशा पाइपची तातडीने तपासणी करून धोकादायक भाग दुरुस्त करणे गरजेचे आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये झाडांचे काय?

फ्लायओव्हरचे स्ट्रक्चरल ऑडिट करताना झाडांच्या वाढीचा आणि मुळांच्या विस्ताराचा स्वतंत्रपणे विचार केला जातो का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संबंधित यंत्रणांनी केवळ झाडांची छाटणी न करता मुळांमुळे संरचनेला झालेल्या संभाव्य नुकसानीचीही तपासणी करणे गरजेचे आहे. भिंतीवर उगवलेले रोप दुर्लक्षित राहिले तर काही वर्षांत त्याचे मोठ्या झाडात रूपांतर होते. त्यामुळे फ्लायओव्हरवरील अशा झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्याची गरज आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरातील उड्डाण पुलांवर झाडे वाढत असतानाही संबंधित यंत्रणांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यातच पावसाचे पाणी वाहून नेणारे पाइप तुटलेल्या अवस्थेत लटकताना दिसत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अपघात किंवा संरचनेचे नुकसान झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित या प्रश्नावर महापालिका प्रशासन नेमकी कधी जागे होणार?, हा सवाल उपस्थित होत आहे.

उपाययोजना काय

  • सर्व फ्लायओव्हरचे तातडीने सर्वेक्षण करून भिंती, बीम, पिलर आणि जोडणीच्या भागांवर उगवलेली झाडे नोंदवावीत

  • झाडे केवळ वरून तोडण्याऐवजी त्यांची मुळे संरचनेत किती खोलवर गेली आहेत, याची तज्ज्ञांकडून तपासणी करावी

  • स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये झाडांच्या वाढीचा स्वतंत्र मुद्दा समाविष्ट करून मुळांमुळे झालेल्या संभाव्य नुकसानीचे मूल्यांकन करावे

  • भिंतींवरील तडे, निखळलेल्या टाईल्स आणि काँक्रीटची झीज तातडीने दुरुस्त करावी

  • पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या पाइपलाइनची तपासणी करून तुटलेले किंवा लटकणारे पाइप तातडीने दुरुस्त करावेत

शहरातील सर्व स्ट्रक्चरवर उगवलेली झाडे काढण्याचे काम सुरू आहे. महामार्गावरील काही ठिकाणी झाडे उंचावर असल्याने ती काढताना अडचणी येत आहेत. त्यामुळे उद्यान विभागाशी समन्वय साधून हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने उंचावरील झाडे काढण्याचे काम करण्यात येत आहे.
प्रेरणा शिणकर, सहशहर अभियंता, स्थापत्य विभाग (स्थापत्य प्रकल्प)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT