Marigold Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Flower Market: खंडेनवमी-दसऱ्यासाठी पिंपरीतील फुलबाजार सजला; झेंडूच्या फुलांना मोठी मागणी

शस्त्रपूजन आणि यंत्रपूजेसाठी केशरी-पिवळ्या झेंडूला पसंती; भाटनगर, चिंचवड स्टेशन आणि पिंपरी मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शारदीय नवरात्रोत्सवामुळे शहरातील वातावरण उत्साहाने भारून गेले आहे. शहर परिसरात सध्या विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. येणाऱ्या खंडेनवमीला अन् दसऱ्यास शहरवासीयांचा उत्साह दुणावेल. या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजून गेल्या आहेत. फुलबाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली असून, खंडेनवमीनिमित्त झेंडू खरेदीस गर्दी दिसून येत आहे.

उद्योगनगरीत खंडेनवमी हा शस्त्र पूजनाचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी शस्त्र, अवजारे, यंत्रे यांची पूजा केली जाते. पूजेसाठी प्रामुख्याने झेंडूच्या फुलांच्या माळा वापरल्या जातात. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून फुल बाजारात झेंडूच्या दरात वाढ झाली आहे. पिंपरीतील भाटनगर, चिंचवड स्टेशन आणि पिंपरी मार्केट येथील फूल विक्रेत्यांकडे सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी दिसून आली. केशरी आणि पिवळ्या झेंडूला सर्वाधिक मागणी आहे.

मंगळवार (दि. २०) विजयादशमी अर्थात दसरा असल्याने आस्थापना तसेच कंपन्यांना सुटी असते. त्यामुळे सोमवार (दि. १९) रोजी अनेक कार्यालयांत, कंपन्यांमध्ये खंडेनवमीनिमित्त आणि यंत्र पूजन केले जाणार असल्याची माहिती उद्योजकांनी दिली. या पार्श्वभूमीवर रविवार (दि. १८) फुलबाजारात गर्दी होती. पिंपरीतील फुलबाजारात होलसेल दरात फुले घेण्यासाठी विक्रेत्यांबरोबर नागरिकांची गर्दी झाली होती.

फुलांचे होलसेल दर

पिवळा झेंडू : ५० - ६०, केशरी झेंडू : ४० - ५०, शेवंती : १२० - १५० रुपये किलो, अष्टर : २५० रुपये किलो, गुलाब : ३०० रुपये, डच गुलाब : १०० रुपये जुडी, निशिगंध : ८०० रुपये, जरबेरा : ६० रुपये किलो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT