पिंपरी: उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मानवी वस्तीत साप आढळत आहेत. सापाच्या मोजक्याच प्रजाती विषारी प्रजाती आहेत. हे सर्प मित्रांना माहिती असल्यामुळे काही बोगस सर्प मित्र पैसे कमविण्यासाठी साप पकडतात; मात्र पकडलेला साप वनविभागाकडे अथवा त्याच्या अधिवासात न सोडता मोकळ्या जागेत सोडला जात आहे. त्यामुळे हे साप पुन्हा मानवी वस्तीत आढळतात. त्यामुळे अशा बोगस सर्पमित्रांपासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
शहर परिसरात सापांच्या 30 ते 32 प्रजाती आढळतात. त्यापैकी चार प्रजाती विषारी आहेत. शहरातील ज्या भागात पानथळ जागा, विहीर, पाणवठे, नदी, नाले, तलाव, आहेत. त्याठिकाणी साप मोठया प्रमाणात आढळत आहेत. उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात साप निघण्याचे प्रमाण आधिक असते. अशा वेळी काही खोटे सर्पमित्र पैसे कमविण्यासाठी साप पकडण्यासाठी जातात. आणि साप पकडताना तेदेखील भयभयीत होत असल्याचे एका महिलेने सांगितले.
त्यामुळे शहरात काही खोटे सर्पमित्र वाढत आहे. मानवी वस्तीत साप आढळल्यानंतर तात्काळ सर्पमित्राला बोलविण्यात येते. तसेच साप पकडण्यासाठी येणाऱ्या सर्पमित्राला 1000 ते 1500 रुपये दिले जातात. चार पैसे मिळवता यावे म्हणून तरुण प्रशिक्षण न घेता साप पकडण्यासाठी जातात. आणि आपला जीव धोक्यात घालत आहे. नागरिकांनादेखील सर्पमित्राची पडताळणी करावे आणि त्यानंतर साप पकडण्यासाठी संबंधितांशी संपर्क साधावा.
सर्पमित्रांचे सापासोबत फोटो सेशन, सोशल मीडियावर प्रसिद्धी
शहर परिसरात न आढळणारा साप जंगली भागातून मागवला जातो. ह्या सापासोबत फोटो, व्हिडीओ काढून पुन्हा हा साप शहराच्या मोकळया जागेत सोडला जातो. तो भागा त्या सापाचा आधिवास नसल्याने त्याला खायला अन्न मिळत नाही. त्यामुळे हा साप मरण पावतो, तर काही वेळा हा साप मानवी वस्तीत सापडल्यावर त्याला मारले जाते. त्यामुळे खोटया सर्पमित्रामुळे सापांचे आयुष्य धोक्यात येत आहे.
सर्पमित्राचे काम काय
साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतलेला, सापांना जीवदान देणारा मित्र म्हणजे सर्पमित्र म्हणून ओळखला जातो. तसेच सर्पमित्राने सापाला योग्य पध्दतीने पकडणे आणि त्याला त्याच्या नैसर्गिक आधिवासात सोडणे हे सर्पमित्राचे मुख्य काम आहे. मात्र काही सर्पमित्र सोशल मिडीयावर प्रसिध्दी मिळविण्यासाठी सापांची हेळसांड करत असल्याने चित्र पहायला मिळत आहे. हे अयोग्य आहे असे पध्दतीचे मत सर्पमित्र मांडत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 150 ते 200 सर्पमित्र आहेत. बोगस सर्पमित्रांकडून वनविभागाच्या हद्दीत हे साप सोडले जात नसल्यामुळे ह्या सापांना खायला अन्न मिळत नसल्याने साप मृत्यू पावत आहे. नागरिकांनी देखील खोट्या मित्रांच्या बळी पडू नये. आणि सर्व सर्पमित्राने साप वनविभागाच्या हद्दीत सोडावे.व्रिकम भोसले, संस्थापक अध्यक्ष, लाईफ प्रोटेक्शन अँड कॉन्सर्वेशन ट्रस्ट
प्रशिक्षण न घेता साप पकडणे चुकीचे आहे; परंतु काही सर्पमित्र चुकीच्या पध्दतीने साप पकतात. यामुळे विषारी साप असल्यास जीव देखील जाण्याची शक्यता आहे.अनिल राठोड, वनपरिमंडळ अधिकारी