Extortion News Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Extortion Case: ‘ईडी’च्या कारवाईची भीती दाखवून बांधकाम व्यावसायिकाकडे ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप

माजी उपमहापौर अमर मुलचंदाणी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा; मारहाण करून तीन धनादेश व प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याची फिर्याद

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: राहत्या घरावर ईडीकडून जप्तीची कारवाई होणार असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाला कार्यालयात बोलावून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. ही घटना २७ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा ते दोनच्या सुमारास पिंपरी येथील जयहिंद शाळेसमोरील कार्यालयात घडली.

याप्रकरणी महेंद्र रामकरणदास अगरवाल (६२, रा. दुरानी कॉलनी, मार्केटयार्ड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, माजी उपमहापौर अमर मुलचंदाणी, नरेंद्र यादव, महादेव साबळे, सुनील डोंगरे, एक महिला आणि इतर तीन ते चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलचंदाणी यांनी अगरवाल यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. ‘मी तुला खूप मदत केली आहे. माझ्या राहत्या घरावर ईडीची जप्तीची कारवाई होणार आहे. ईडीला पैसे दिले नाहीत तर मी रस्त्यावर येईन आणि माझे कुटुंब उद्ध्वस्त होईल,’ असे सांगून त्यांनी पैशांची मागणी केली.

अगरवाल यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच, जीवे मारण्यासह ॲट्रॉसिटी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची मागणी केली. जबरदस्तीने तीन धनादेश आणि एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रूपाली बोबडे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT