पिंपरी: निगडी प्राधिकरण येथील स्वर्गीय इंदिरा गांधी उद्यान तथा दुर्गादेवी टेकडी येथील अप्पूघर परिसरात वृक्षतोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक वर्षांपासून या परिसराची शोभा वाढवणारे आणि जैवविविधतेचा भाग असलेले मोठे वृक्ष अचानक तोडले गेल्यामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दुर्गादेवी टेकडी तसेच, अप्पूघर परिसर हा निगडी प्राधिकरणाचे दाट हरित क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथे दररोज शेकडो नागरिक सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी तसेच, व्यायामासाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या भागात कोणतीही पूर्वकल्पना न देता अनेक झाडांवर कुर्हाड चालवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार विकास कामांच्या नावाखाली किंवा इतर कारणांसाठी अशा प्रकारे जुनी आणि मोठी झाडे तोडली जात आहेत. वृक्षतोड अधिकृत असेल, तर महापालिकेच्या उद्यान विभागाने याबाबतची नोटीस किंवा फलक परिसरात लावलेला नाही.
महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमानुसार, कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी जागेवरील झाड तोडण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक असते. वृक्षतोडीच्या ठिकाणी उद्यान विभागाने पाहणी करावी.
संबंधित झाडे तोडण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे का. परवानगीतील अटींचे पालन झाले आहे का, याची सखोल चौकशी करावी. परवानगी नसताना वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तत्काळ वृक्षतोड थांबवावी, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे.