पिंपरी: अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांचा साठा करणाऱ्या दांपत्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 15) दुपारी जांभे येथील एका गोदामावर करण्यात आली.
पोलिस शिपाई मितेश यादव यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कैलास दत्तात्रय मांढरे (54, रा. म्हाळसाकांत चौक, आकुर्डी) आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. त्यांच्यासह रितेश गुप्ता (रा. कनोज, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या गोदामात अंमली पदार्थ मिश्रित पावडर, द्रव पदार्थ साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई करत कैलास आणि त्याच्या पत्नीला अटक केली.
या कारवाई मध्ये पोलिसांनी अमली पदार्थ मिश्रित पावडर, द्रव पदार्थ, मशीन, मोबाईल आणि एक चारचाकी गाडी असा एकूण 6 लाख 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी हे अंमली पदार्थ मिश्रित काळा पदार्थ पानामध्ये टाकून खाण्यासाठी तयार करून विकत असत. हा माल त्यांनी उत्तर प्रदेशातील आरोपीकडून मागवला असल्याचे तपासात समोर आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
वेगात आलेल्या एका ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार (दि. 14) रात्री सुमारास चिखली येथील संविधान चौक परिसरात घडली. रवींद्र पांडुरंग सांगळे (50) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक जितेंद्र रामसंजीवन पटेल (35, रा. इंदोरी बायपास, तळेगाव एमआयडीसी; मूळ- इटमा, मध्यप्रदेश) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती रविंद्र सांगळे हे त्यांच्या शाईन मोटारसायकलवरून जात होते. यावेळी आरोपीने आपल्या ताब्यातील ट्रक बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने चालवून सांगळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने रविंद्र सांगळे यांचा मृत्यू झाला.