पिंपरी: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन विभागाकडून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची होणारी गर्दी आणि नियमित बससेवेवरील वाढता ताण लक्षात घेता पिंपरी-चिंचवड आगाराच्या वतीने ३ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत एकूण ४१० बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये २११ अतिरिक्त बसफेऱ्या, तर १९९ नियोजित बसफेऱ्यांचा समावेश आहे. या बससेवेचा लाभ प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील गावी जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी अधिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.
दिवाळीनिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात कामानिमित्त वास्तव्यास असलेले अनेक नागरिक कुटुंबासह मूळ गावी जाण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील विविध गावांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन परिवहन विभागाने अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे.
फलाटनिहाय माहितीमुळे प्रवाशांची धावपळ टळणार!
केवळ अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यापुरतेच नियोजन मर्यादित न ठेवता प्रवाशांना बस शोधताना होणारी गैरसोय टाळण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक फलाटाला क्रमांक देण्यात आला असून, संबंधित फलाटावरून कोणत्या ठिकाणी जाणारी बस सुटणार आहे, याची माहिती नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या गंतव्यस्थानाची बस सहज शोधता येणार असून बसस्थानकावरील अनावश्यक धावपळ आणि गोंधळ कमी होण्यास मदत होणार आहे.
गर्दीचे व्यवस्थापन अन् सुरक्षिततेला प्राधान्य
दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बसस्थानकांवर वाहतूक व्यवस्थापन, फलाटावरील नियोजन आणि प्रवाशांना आवश्यक मार्गदर्शन करण्यावर भर दिला जाणार आहे. अतिरिक्त बसफेऱ्यांमुळे प्रवाशांना प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनी शक्यतो प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि अधिकृत तिकीट आरक्षण सुविधांचा वापर करावा, असे आवाहन आगार व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी फलाट आणि स्थानाची माहिती दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना आपली बस शोधताना गैरसोय होणार नाही आणि कोणतीही गडबड न होता प्रवास करता येईल.पल्लवी पाटील, आगार व्यवस्थापक, पिंपरी-चिंचवड