Eco-Friendly Diwali Sky Lanterns: आकाशकंदिलांच्या झगमगाटाने फुलली पिंपरीची बाजारपेठ Pudhari
पिंपरी चिंचवड

Eco-Friendly Diwali Sky Lanterns: आकाशकंदिलांच्या झगमगाटाने फुलली पिंपरीची बाजारपेठ

बांबू, मायक्रॉन आणि पुठ्ठ्यापासून तयार नाविन्यपूर्ण कंदिलांनी बाजारपेठ रंगली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : दिवाळीची रोषणाई खऱ्या अर्थाने जाणवते ती झगमगणाऱ्या आकाशकंदिलांनी. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठेत गजबज दिसून येत आहे. बाजारात यंदा पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचा झगमगाट पाहायला मिळत आहे.(Latest Pimpri chinchwad News)

खरेदीसाठी लगबगीने बाजारात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. आकाशकंदिलांच्या स्टॉल्समुळे दिवाळीची चाहूल जाणवत आहे. दिवाळीची शोभा वाढवणारे वेगवेगळ्या आकारातील आणि आकर्षक रंगातील आकाशकंदील विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहेत. 100 पासून 1000 रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. तसेच यंदा छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीरामाच्या प्रतिमेचे आकशकंदिलदेखील दिसून येत आहेत.

यामध्ये हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहे. रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोजन कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, मेटल स्टार, लोटस, फायरबॉल, झगमगते आकाशकंदील. विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक आकाराचे आकाश कंदील पहायला मिळत आहेत. त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा, चांदणी, बॉल, पॅराशूट असे प्रकार आहेत. बांबूपासून तयार केलेले आकर्षक आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी आले आहेत.

थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळून केलेल्या पारंपरिक व पर्यावरणपूरक आकाशकंदील खरेदी करण्याकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. वेगवेगळ्या रंगातील आणि विविध आकारांतील आकाशकंदिलांना मागणी वाढत आहे. छोटे-छोटे आकाशकंदील डझनावर मिळत असून, दहापासून ते पन्नास रुपयांपर्यंत किंमत आहे.

नावीन्यपूर्ण मायक्रॉन, बांबूच्या काड्यांचे आकाशकंदील

कागद आणि कापडाबरोबरच मायक्रॉन आणि बांबूच्या काड्यांपासून बनविलेले आकाशकंदील हे वेगळेपणा जपत आहेत. मायक्रॉनच्या रंगबेरंगी धाग्यापासून सुरेख विणकाम केलेले आकाशकंदील लक्षवेधी ठरत आहेत. तर बांबूच्या काड्यापासून तयार केलेले आकाशकंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे.

झुरमुळ्यांचे आकाशकंदील बाजारात यंदा षटकोनी आणि झुरमुळ्यांचे आकाशकंदील मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. हे आकाशकंदील पर्यावरणपूरक आहेत. यामध्ये बांबू आणि कागदाचा वापर केला जातो. तसेच कुठेही स्टॅप्लरची पिन वापरली जात नाही. तर चिटकविण्यासाठी खळ वापरला जातो.

पुठ्ठा आणि कार्डबोर्डपासून बनविलेले आकाशकंदील पुठ्ठा आणि कार्डबोर्डपासून तयार केलेले हे आकाशकंदीलदेखील पर्यावरणपूरक आहेत. यामध्ये जाड पुठ्ठा किंवा कार्डबोर्ड वापरून चौकोनी, गोल आकारात हे आकाशकंदील उपलब्ध आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT