चाकण: बेपत्ता गुन्ह्यातील व्यक्तीचा शोध घेत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून खून उघडकीस आणला. खेड तालुक्यातील एकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चार पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली.
शानू रफिक मोहम्मद शेख (रा. विलेपार्ले, मुंबई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या खुनाबद्दल शरद गौतम घरद (36, रा. काळेवाडी) याला अटक करण्यात आली. त्याच्यासह गिरीधर वाल्मीक रेडे (रा. मोई, ता. खेड) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Latest Pimpri News)
शानू हे कामानिमित्त एमआयडीसीमधील एका कंपनीत एक दिवसापूर्वी आले होते. मात्र, ते घरी न पोहचल्याने आणि मोबाईल बंद आढळल्याने कंपनीतील व्यस्थापकाने पोलिसांत बेपत्ता असल्याची नोंद केली. या प्रकरणात संशयास्पद बाबी आढळल्याने गुन्हे शाखा युनिट चारला तपासाची जबाबदारी दिली.
युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास करण्यात आला. दरम्यान पेरणे फाटा, भीमा नदीपात्रात एक मृतदेह आढळून आला. नातेवाइकांनी मृत व्यक्तीची ओळख पटवली.
शानू यांचा मृतदेह असल्याचे समोर आले. त्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा वाकड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. तांत्रिक तपासावरून संशयित शरद घरद याला युनिट चारच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने शानू याला जेवणाच्या बहाण्याने काळेवाडी येथे बोलावून घेतले. त्यानंतर दारूच्या नशेत किरकोळ वादातून दगडाने ठेचून खून करत मृतदेह भीमा नदीत फेकल्याचे उघड झाले.