

Marriage refusal assault
चाकण: ’तू मेरे साथ शादी नहीं कर रही है... मैं अभी तुझे जान से मार देता हूँ...’ असे म्हणत 26 वर्षीय तरुणीला मारहाण करीत थेट इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून खाली फेकून दिले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना चाकण (ता. खेड) येथील राणूबाईमळ्यात शुक्रवारी (दि. 25) रात्री 10 वाजता घडली.
सुमित्रा सिंग (वय 26, रा. राणूबाईमळा, चाकण, ता. खेड; मूळ रा. छत्तीसगड) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सुरेशसिंग शिवकुमार (रा. छत्तीसगढ) याच्यावर चाकण पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेशसिंग हा फिर्यादी तरुणीचा मित्र असून, तो तिच्या राहत्या घरी आला. या वेळी तिने सुरेशसिंगला लग्नास नकार दिला. त्यावरून ’तू मेरे साथ शादी नहीं कर रही है... मैं अभी तुझे जान से मार देता हूँ...’ असे म्हणून तिला मारहाण केली आणि तिला दुसर्या मजल्याच्या पॅसेजवरून खाली फेकून दिले. त्यामुळे संबंधित तरुणीच्या डाव्या मांडीचे हाड, बरगडी तसेच पाठीचा मणका फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी सुरेशसिंगवर चाकण पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.