पिंपरी: मागील वर्षी दांडिया खेळताना झालेल्या भांडणाची धग वर्षभरानंतर पुन्हा उफाळून आली. जुन्या वादातून दोन गट एकमेकांना भिडल्याने बौद्धनगर परिसरात तुंबळ हाणामारी झाली. तसेच, दगडफेक, कोयत्याने हल्ला आणि घरासह दुकानाची तोडफोड करण्यात आली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. १४) रात्री गिरजुबाबा मंदिराजवळ घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करून सहा जणांना अटक केली आहे.
पहिल्या प्रकरणात ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ ऊर्फ चिमुकल्या गालफाडे (२०), सुखदेव जेट्टीथोर (वय २१), प्रतीक अंकुटे (वय १९), विशाल गालफाडे (वय २२), अभिषेक व्यंकट कांबळे (वय १९), गुड्या गालफाडे (वय २१) आणि दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात यश बाळासाहेब गायकवाड (रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भगवान नरहरी माने (४८), साहील माने, निखील माने, विकास माने आणि एका ४० वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बौद्धनगर परिसरात दरवर्षी दांडियाचे आयोजन केले जाते. मागील वर्षी दांडिया पाहण्यासाठी आलेल्या सिद्धार्थ आणि त्याच्या मित्रांचा भगवान माने यांच्या कुटुंबीयांशी वाद झाला होता. त्याच वादातून यंदाही दोन्ही गट आमनेसामने आले होते. त्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. दोन्ही गटांकडून मारहाण करण्यात आली.
या गोंधळात दुकानाची तोडफोड करण्यात आली, तर माने यांच्या घरातील साहित्यांचेही नुकसान झाले आहे. सिद्धार्थ आणि त्याच्या मित्रांवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हाणामारीत यश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत.