Pimpri Cycle Track Encroachment Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Cycle Track Encroachment Issue: पिंपरीत सायकल संस्कृती परततेय; पण ट्रॅकवरील अतिक्रमणामुळे धोका वाढला

इंधन बचतीसाठी नागरिक सायकलकडे वळले; मात्र सायकल ट्रॅकवर कब्ज्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर शहरात आता सायकल संस्कृती पुन्हा एकदा वेगाने परतताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील प्रमुख रस्ते, शाळा परिसर, कोचिंग क्लास भाग आणि कार्यालयीन मार्गांवर सायकलस्वारांची संख्या लक्षणीय वाढल्याचे चित्र आहे.

पूर्वी मुलांना दुचाकीवरून शाळा व क्लासला सोडणारे पालक आता स्वतः सायकल चालवत मुलांनाही सायकल वापरण्यास प्रोत्साहन देताना दिसत आहेत. अनेक नागरिकांनी पेट्रोलवरील खर्च कमी करण्यासाठी तसेच आरोग्य टिकवण्यासाठी सायकलचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

मात्र, एका बाजूला इंधन बचतीची सकारात्मक चळवळ वाढत असताना दिसत आहे. शहरात कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेले सायकल ट्रॅक आज बहुतांश ठिकाणी अतिक्रमण, फेरीवाले, स्टॉल आणि पार्किंगच्या विळख्यात अडकले असून सायकलस्वारांना थेट मुख्य रस्त्यावरून वाहतुकीतून मार्ग काढावा लागत आहे.

हॉर्नचा दबाव वाढला

मुख्य रस्त्यावर सायकल चालवताना मागून येणारी वाहने सतत हॉर्न वाजवत असल्याने सायकलस्वारांवर मानसिक दबाव निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. काही वाहनचालकांकडून सायकलस्वारांना तातडीने बाजूला होण्यास सांगितले जाते. मात्र, सायकलचा वेग कमी असल्याने आणि संतुलन राखावे लागत असल्याने अचानक बाजूला जाणे शक्य होत नाही. अशा वेळी घाईत सायकल बाजूला घेताना तोल जाण्याच्या घटना घडत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.विशेषतः शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.

सायकल ट्रॅकवरच अतिक्रमणांचा कब्जा

शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर तयार करण्यात आलेले सायकल ट्रॅक आज अक्षरशः गायब झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी ट्रॅकवर खाद्यपदार्थांचे स्टॉल, हातगाड्या आणि फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. तर, अनेक ठिकाणी ट्रॅकवर दुचाकी व चारचाकींचे पार्किंग केले जात आहे. परिणामी सायकलस्वारांना जड वाहनांच्या गर्दीतून मुख्य रस्त्यावर सायकल चालवावी लागत आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांमध्ये सायकल चालवताना अपघाताचा धोका वाढत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

इंधन बचतीची चळवळ

शहरात ग्रीन सिटी, पर्यावरणपूरक वाहतूक, सस्टेनेबल मोबिलिटी यांसारख्या संकल्पनांची मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते. मात्र, प्रत्यक्षात सायकलस्वारांसाठी सुरक्षित सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिक इंधन बचतीसाठी पुढाकार घेत असताना प्रशासनाने सुरक्षित सायकल ट्रॅक, स्वतंत्र लेन आणि अतिक्रमणमुक्त मार्ग उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT