खंडणीविरोधी पथकाने खुनाचा कट उधळला; अल्पवयीन टोळक्याकडून शस्त्रसाठा जप्त File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpri Crime Branch: खंडणीविरोधी पथकाने खुनाचा कट उधळला; अल्पवयीन टोळक्याकडून शस्त्रसाठा जप्त

अंडाभुर्जीच्या गाडीवरील वादातून ‘काटा काढण्याचा’ प्लॅन; दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : अंडाभुर्जीची गाडी लावण्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने प्रतिस्पर्ध्याचा ‌‘काटा‌’ काढण्याचा कट रचला. यासाठी मध्य प्रदेशातून शस्त्रसाठा मागवला होता; मात्र गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने योग्य वेळी कारवाई करत हा डाव उधळून लावला. मंगळवार (दि. 4) सायंकाळी सांगवीतील एका रुग्णालयाच्या मागील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत..(Latest Pimpri chinchwad News)

याप्रकरणी पोलिस शिपाई प्रदीप गोडांबे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहा अल्पवयीन मुलांसह आर्यन फंड (19, रा. रांजणगाव, पुणे) आणि गुरू सिंग (23, रा. मध्य प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील रवी ससाणे आणि आरोपी यांच्यात औंध येथील मॉलजवळ अंडाभुर्जीची गाडी लावण्यावरून वाद सुरु होते. या वादातून दोन्ही गटांमध्ये पूर्वी मारहाण झाली होती. दरम्यान, आर्यन आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांनी रवी ससाणे याचा खून करण्याचा निर्णय घेतला. यासाठी टोळक्याने बैठका घेऊन योजना आखली. ससाणे वाचू नये, यासाठी त्यांनी गोळ्या झाडून खून करण्याचे ठरवले. त्यासाठी मध्य प्रदेशातील गुरू सिंग याच्याशी संपर्क साधून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मागवली. नंतर हे टोळके ससाणे याला गाठण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत होते.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला आरोपींच्या योजनेची माहिती मिळाली. अधिक चौकशी केली असता, आरोपी सांगवीतील रुग्णालयाच्या मागे भेटणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, पथकाने साध्या वेशात परिसरात सापळा रचला. आरोपी तेथे पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत सहा अल्पवयीनांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

सोशल मीडियावरील पोस्टमुळे पोलिसांना धागा

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह हिंसक किंवा प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंट्‌‍सवर वॉच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथक सतत ऑनलाइन लक्ष ठेवत होते. या गुन्ह्यातील आरोपीदेखील आपल्या सोशल मीडियावर हिंसक आणि धमकीपर पोस्ट शेअर करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याच धाग्याने पथकाने त्यांच्या हालचालींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पथकाला आरोपींनी रचलेल्या खुनाच्या कटाची माहिती मिळाली.

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने खुनाच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अंडाभुर्जीच्या गाडीवरील वादातून आरोपींनी हा कट रचल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT