

पिंपरी : व्हिसाची मुदत संपल्यानंतरही दोन वेगवेगळ्या नावांनी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी सेलने भोसरीतून अटक केली. संबंधित महिलेला तिच्या देशात पाठविण्याची कार्यवाही भोसरी पोलिसांकडून सुरू आहे.(Latest Pimpri chinchwad News)
फातिमा अमजद अख्तर (वय 35) असे अटक केलेल्या बांगलादेशी महिलेचे नाव आहे. दरम्यान, ती भारतात माला विठ्ठल डावखर उर्फ फातिमा बेगम फईमुद्दीन या दोन वेगवेगळ्या नावांनी वास्तव्यास होती. काही वर्षांपूर्वी फातिमा व्हिसा घेऊन बांगलादेशमधून भारतात आली होती. कामाच्या शोधात ती घरकाम करू लागली. मात्र, व्हिसाची मुदत संपल्यानंतरदेखील ती आपल्या देशात परतली नाही.
दरम्यान, तिने कर्नाटकातील एका व्यक्तीसोबत विवाह केला. तिच्या पतीला ती बांगलादेशी असल्याची कल्पना होती. हे दाम्पत्य भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत राहत होते. परदेशी नोंदणी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी फातिमाचा शोध घेऊन मंगळवारी (दि. 4) तिला जेरबंद केले. सध्या तिला तिच्या देशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भारतामध्ये कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांशिवाय घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा वारंवार चव्हाट्यावर येत आहे.
चालू वर्षात, म्हणजे जानेवारीपासून आतापर्यंत, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने एकूण 19 बांगलादेशींना जेरबंद केले आहे. मे 2025 मध्ये केंद्र सरकारने बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्यासंदर्भात नवीन नियमावली तयार केली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत 8 बांगलादेशींना त्यांच्या देशात हद्दपार (डीपोर्ट) केले आहे. याशिवाय, 74 बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट, 5 आधारकार्ड, 7 पॅनकार्ड आणि 4 मतदान ओळखपत्रे रद्द करण्यात आली आहेत.