Pimpri Chinchwad Zebra Crossing Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Zebra Crossing: साहेब तुम्हीच सांगा, रस्ता ओलांडायचा कसा?

सुरक्षिततेचे पट्टे केवळ नावालाच; शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: रस्त्यावर पांढरे पट्टे आहेत, पण त्यावर वाहनांचा ताबा दिसत आहे. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग आखला आहे, पण तिथून चालण्याची मुभाच नाही. वाहतुकीचे नियम कागदावरच असून, चौकात त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शहरातील प्रमुख चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने उभी राहत असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्ता ओलांडण्यासाठी आखून दिलेल्या जागेवरच वाहनचालकांनी कब्जा केल्याने नागरिकांना थेट धावत्या वाहतुकीतून वाट काढावी लागत आहे. मग पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग आखण्याचा नेमका उपयोग काय? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

सुरक्षिततेच्या पट्ट्यांवरच वाहनांचा ताबा

झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी केल्याने पादचाऱ्यांसाठी राखीव असलेली जागाच अडवली जात आहे. नियमांचे पालन करण्याऐवजी वाहनचालकांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, सुरक्षित मार्ग असूनही नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही.

शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांची कसरत

शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत चौकांमध्ये वाहनांची वर्दळ वाढते. अशावेळी झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने उभी असल्याने विद्यार्थ्यांना धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागतो. यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कारवाई केवळ नियमभंगानंतरच?

झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. प्रमुख चौकांमध्ये नियमित गस्त, सीसीटीव्हीद्वारे देखरेख आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केल्यास हा प्रकार रोखता येऊ शकतो. केवळ पट्टे आखून पादचारी सुरक्षा सुनिश्चित होणार नाही.

झेब्रा क्रॉसिंग हे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा म्हणून बनवले आहेत. मात्र, त्याच जागेवर वाहने उभी राहत असतील, तर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी रस्ता ओलांडायचा तरी कसा? एखादा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? नियम मोडणाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे.
सोनाली परीट, शिक्षिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT