Pimpri Chinchwad Wrong Side Driving Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Wrong Side Driving: पिंपरी-चिंचवडमध्ये राँग साईडचा धुमाकूळ; पीएमपी बसचालकांची कसरत, अपघाताचा धोका वाढला

दुचाकीस्वार, रिक्षाचालक थेट चौकात घुसत असल्याने वाहतूक कोंडी; कठोर कारवाईसह बॅरिकेड्स आणि कायमस्वरूपी पोलिसांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहरातील अनेक चौकात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवत थेट चौकात घुसत आहेत. या बेशिस्त वाहतुकीचा सर्वाधिक फटका पीएमपी बससेवेला बसत असून, बसचालकांना वळण घेताना त्रास होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी, प्रवाशांचा खोळंबा आणि अपघाताचा धोका वाढत असतानाही वाहतूक विभागाचे दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे.

पीएमपी बसचालकांची मोठी कसरत

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे पीएमपी बसचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मोठ्या आकाराच्या लांब बसला वळण घेताना समोरून अचानक दुचाकी किंवा रिक्षा आल्याने बस थांबवून मागे-पुढे करावी लागते. यामुळे वाहतुकीचा वेग कमी होतो, मागे वाहनांच्या रांगा लागतात आणि बसमधील प्रवाशांचाही वेळ वाया जात असल्याचे चालक सांगत आहेत.

वाहतूक पोलिस नेमके कुठे?

भर चौकात नियमभंग सुरू असतानाही वाहतूक पोलिसांची प्रभावी उपस्थिती दिसून येत नसल्याने दररोज एकाच ठिकाणी होत असलेल्या नियमभंगाकडे दुर्लक्ष का केले जात आहे?, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सीसीटीव्ही, ई-चलन आणि प्रत्यक्ष कारवाई असूनही जर अशी परिस्थिती असेल तर, नियमांची अंमलबजावणी नेमकी कोण करणार?, असा सवालही उपस्थित होत आहे.

अपघात होण्याची वाट पाहताय का?

चौकातील ही बेशिस्त वाहतूक भविष्यात गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकते. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई, कायमस्वरूपी वाहतूक पोलिस, बॅरिकेड्स आणि विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा तो होण्यापूर्वीच प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

उपाययोजना

  • चौकांत गर्दीच्या वेळेत कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी

  • विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी

  • चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून ई-चलन प्रणाली प्रभावीपणे राबवावी

  • राँग साईडने प्रवेश होणाऱ्या ठिकाणी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलक बसवावेत.

  • पीएमपी बसच्या वळणासाठी स्वतंत्र आणि अतिक्रमणमुक्त जागा सुनिश्चित करावी

  • वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम राबवावी.

  • वारंवार नियमभंग करणाऱ्यांचे वाहन परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवावा.

पीएमपी बस वळवताना सर्वांत मोठी अडचण म्हणजे विरुद्ध दिशेने अचानक येणाऱ्या दुचाकी आणि रिक्षा. मोठी बस असल्यामुळे आम्हाला वाहन थांबवून वारंवार मागे-पुढे करावे लागते. त्यामुळे बसला उशीर होतो, वाहतूक कोंडी वाढते आणि प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. नियम पाळले तर ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
पीएमपी बसचालक
अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. चौकातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तसेच पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात येईल. नागरिकांनीही काही क्षणांचा वेळ वाचविण्याच्या नादात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये.
अमित डोळस, वरिष्ठ वाहतुक पोलिस निरीक्षक, पिंपरी चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT