Pimpri Chinchwad Water Wastage Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Water Wastage: पाणीटंचाईच्या काळात महापालिकेचे टँकर बीआरटीचे दुभाजक धुण्यासाठी!

पिंपरी-चिंचवडमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संताप; प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर होत असल्याचे महापालिकेचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: राज्यात दुष्काळाचे भीषण संकट असल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात पाणीकपात सुरू आहे. असे असताना महापालिकेच्या टँकरने बीआरटी मार्गातील बॅरिकेट‌्स धुण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून पाणी वाया घालवण्याच्या प्रकारावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यात दुष्काळ पडला आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने शहरात पाणीकपात सुरू केली आहे. अशा परिस्थितीत महापालिकेचा एक असंवेदनशील प्रकार समोर आला आहे. काळेवाडी परिसरात भर उन्हात महापालिकेने पाण्याचे टँकर आणून बीआरटीएसचे दुभाजक धुण्याचा प्रकार समोर आला आहे.

एका बाजूला नागरिक पाण्याच्या तक्रारी करत असताना, दुसरीकडे टँकरने पाणी आणून ते अशा प्रकारे वाया घालवले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुभाजक धुण्याचे प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाणी काटकसरीने वापरा, असे उपदेश देणार्‍या महापालिका प्रशासनाची या प्रकारावरून रोष व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील रस्त्यावरील बीआरटीएसचे रेलिंग व दुभाजकांची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे. ते काम महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या टँकरमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या शुद्ध पाण्याचा वापर यासाठी केला जात नाही. पावसाळ्यामुळे रस्त्यावरील चिखल, माती व धूळ बीआरटी रेलिंग व दुभाजकांवर साचलेली आहे. या थरामुळे रेलिंगचा रंग, दुभाजकांच्या कडा व त्यावरील परावर्तक पट्टे झाकले जाऊन ते वाहनचालकांना स्पष्टपणे दिसण्यात अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही स्वच्छता केवळ सौंदर्यीकरणाचा भाग नसून, रस्ते सुरक्षिततेशी संबंधित देखभाल दुरुस्तीचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणून करण्यात येत आहे.
बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, दळणवळण विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT