पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेने अधिकृतपणे १० टक्के पाणीकपात लागू करून नागरिकांना 'थेंब थेंब पाणी जपून वापरा' असा सल्ला दिला आहे. मात्र, दुसरीकडे प्रशासकीय नियोजन आणि अनास्थेमुळे शहरातील रस्त्यांवर लाखो लिटर पिण्याचे पाणी वाहून जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
नाशिक फाटा सिग्नल येथे मुख्य पाईपलाईनमधून प्रचंड प्रमाणात पाणीगळती सुरू असून, पाण्याचे पाट रस्त्यावरून वाहत आहेत. यामुळे महापालिकेचा कारभार म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे. एकीकडे नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागड्या दराने खासगी टँकर मागवून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शुद्ध पाण्याचा अमूल्य साठा वाया जात आहे. या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सोसायट्यांची खासगी टँकरवर मदार
शहरातील अनेक सोसायट्या आणि वस्त्यांमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लोकांना खासगी टँकरचालकांना अवाजवी दर मोजावे लागत आहेत. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मागण्या व उपाययोजना
तत्काळ दुरुस्ती : नाशिक फाटा सिग्नल येथील फुटलेली/गळती लागलेली पाईपलाईन युद्धपातळीवर दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय थांबवण्यात यावा.
ऑडिट व पाहणी : शहरातील संपूर्ण जलवाहिन्यांचे 'वॉटर ऑडिट' करून इतर ठिकाणी होणारी गळती शोधून ती तातडीने बंद करण्यात यावी.
'स्मार्ट सिटी'त पाण्याचे पाट
नाशिक फाटा हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि गजबजलेला चौक आहे. याच सिग्नल परिसरात जलवाहिनी फुटून तसेच व्हॉल्व्हमधून गळती होऊन पाण्याचा प्रचंड प्रवाह रस्त्यावर पसरला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक तास पाणी वाया जात असतानाही ते रोखण्यासाठी महापालिकेची कोणतीही आपत्कालीन यंत्रणा वेळेत दाखल झाली नव्हती.
आयुक्तांचे आदेश कागदावरच!
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाणी बचतीचे कडक पाऊल उचलत सर्व विभागांना पाण्याच्या अपव्ययाविरुद्ध कठोर उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. "कुठेही पाणीगळती आढळल्यास ती प्राधान्याने आणि तातडीने दुरुस्त करण्यात यावी," अशा कडक सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. मात्र, नाशिक फाट्यावरील या प्रकारामुळे 'आयुक्त सांगतात एक आणि अधिकारी करतात भलतेच' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला कनिष्ठ कर्मचारी आणि पाणीपुरवठा विभाग जुमानत नाही का? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.
आम्हाला पाणी जपून वापरायला सांगणाऱ्या महापालिकेला स्वतःच्या पाईपलाईन सांभाळता येत नाहीत का? नागरिकांनी टँकरचे पैसे भरून मरायचे आणि महापालिकेने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहू द्यायचे, हा कुठला न्याय?माउली थोरात, सामाजिक कार्यकर्ते
सदर ठिकाणी एमआयडीसीच्या दोन जोडण्या असून, वल्लभनगर टाकी तसेच एमआयडीसी येथून पाणीपुरवठा केला जातो. संबंधित जलवाहिनी 40 ते 45 वर्षे जुनी आहे. पाण्याचा प्रवाह सुरू असतानाच रबरी कपलिंगच्या साह्याने तातडीने दुरुस्ती करण्यात आली असून, त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी पाणी पुलापर्यंत गेले होते. जलवाहिनीचे कायमस्वरूपी वेल्डिंग करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.महेश बरिदे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका