पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे संकट आले आहे. त्यामुळे महापालिकेचे जलतरण तलाव बंद करावेत आणि वॉशिंग सेंटरवर कारवाई करा, असे आदेश महापौर रवी लांडगे यांनी सोमवारी (दि. 15) महापालिका प्रशासनास दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील विविध गावांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून सोडलेले पाणी नदीवरील रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातून उचलते. दररोज 550 एमएलडी अशुद्ध पाणी उपसा करून ते निगडीतील प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे शुद्धीकरण प्रक्रिया करून संपूर्ण शहराला जलवाहिनीद्वारे पुरविले जाते. पवना धरणातून मावळातील नगरपालिका, ग्रामपंचायत आणि एमआयडीसीलाही पाणी दिले जाते.
पवना धरणात 20 टक्केच पाणीसाठा
शहराची जीवनदायिनी असणार्या पवना धरणातील पाणीसाठा 20 टक्क्यांवर, तर आंद्रा धरणातील पाणीसाठा 29 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिकेला 15 टक्के पाणी कपातीची सूचना केली आहे. मात्र, याबाबत येत्या पंधरवड्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. याबाबत आजच्या सभेत पाण्याबाबत काही नगरसेवकांनी मते व्यक्त केली. त्यावर महापौर लांडगे यांनी पाणी कपातीचे सुताेवाच केले आहे.
नियम मोडणार्यावर गुन्हे दाखल करा: महापौर लांडगे
महापौर लांडगे म्हणाले, की पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. यंदा पाऊस लांबला असल्यामुळे पाणी कमी पडू शकते. पाटबंधारे विभागाने महापालिकेस 15 टक्के पाणी कपात करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याबाबत लवकरच आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
तत्पूर्वी शहरातील महापालिकेचे सर्व जलतरण तलाव तातडीने बंद करावेत, पाण्याची नासाडी आणि अपव्यय थांबवावा. त्याचबरोबर वॉशिंग सेंटरच्या माध्यमातून पाण्याचा होणारा अपव्यय थांबविणे गरजेचे आहे. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी आणि नियम मोडणार्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश महापौर लांडगे यांनी दिले आहेत.