पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढीबरोबरच वाहनांचा आकडा त्याच पटीने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबर अखेरीस पिंपरी चिंचवड शहरात जवळपास 25 लाख 16 हजारांहून अधिक वाहने धावत आहेत. त्याचबरोबर विविध शहरातून, जिल्ह्यांतून स्थायिक झालेल्या शहरवासीयांच्या वाहनांचा आकडा वेगळा आहे. दरम्यान, वाहनांच्या विक्रीमुळे आरटीओच्या उत्पन्नामध्ये 1219 कोटी 14 लाखांची भर पडली आहे. गेल्या चार वर्षांत हा आकडा रेकॉर्ड ब्रेक ठरला आहे.
शहराचे वाढते आकारमान, इमारतींची संख्या, शहरीकरण त्याचप्रमाणे आयटी पार्क आणि स्मार्ट सिटीमुळे शहरवासियांची संख्यादेखील वाढत आहे. सद्यस्थितीमध्ये शहराची लोकसंख्या 35 ते 40 लाख असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी शहरामध्ये वाहनांची संख्या ही जेमतेम 18 ते 20 लाखांच्या घरात होती. मात्र, गेल्या चार वर्षांत ती संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आतापर्यंत वर्षभरात एक ते दीड लाख वाहने विक्री जात होती. तीच संख्या आता जवळपास पावणे दोन लाख ते दोन लाखाच्या पुढे पोहोचली आहे. 2024-2025 मध्येच त्याची आकडेवारी जवळपास 2 लाख 18 हजार झाली आहे.
दुचाकींची संख्या वाढली
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढवून तो पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्य करण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात स्वतंत्र सोयीदेखील देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहराप्रमाणेच काही ग्रामीण भागाचादेखील भाग त्याला जोडण्यात आलेला आहे. दरम्यान, या भागाचा वाढती लोकसंख्येच्या मनानेच वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे दुचाकीच संख्या अधिक आहे.
ईव्ही वाहनांच्या नोंदी वाढल्या
पेट्रोल आणि सीएनजीला सक्षम असा पर्याय आता उपलब्ध झाला असून, तो इलेक्ट्रिक व्हेईकल आहे. यापूर्वी दुचाकीसाठी पसंती होती. मात्र, तोच ग्राहक आता या वाहनांकडे वळू लागला आहे. गतवर्षात जवळपास 15 हजार वाहने इलेक्ट्रॉनिक विकली गेली आहेत.
नोंदणी आणि महसुलात देखील वाढ
गेल्या चार वर्षांत म्हणजेच 2022 ते 2025 या दरम्यान महसुलामध्ये जवळपास शंभर कोटीपेक्षा अधिक वाढ होत आहे. 2022 मध्ये 822 कोटी महूसल होता. 2023 मध्ये 978 कोटी, 2024 मध्ये 1095 कोटी होता. आता 2025 मध्ये थेट 1219 कोटी पुढे महसूल गेला आहे. हा सर्वांत मोठा आकडा असल्याचे आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले.