पिंपरी: चिंचवड येथील मरहूम फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत कुदळवाडी, चिखली या परिसरात राहणारे अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येतात; मात्र या विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत थेट बससुविधा नसल्याने दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरासाठी दोनदा बस बदलाव्या लागतात.
शाळेसमोरील रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ असते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना बसची प्रतीक्षा करण्यासाठी वर्दळीच्या रस्त्यावरच उभे रहावे लागत असल्याची परिस्थिती आहे. पालिकेने सर्व शाळा खासगी शाळांच्या तुलनेत डिजिटल स्मार्ट केल्या आहेत. मात्र, शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा देण्यात मात्र अपयश आलेले दिसते.
शहरातील परिसर सोडल्यास उपनगरातील विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी पीएमपीतून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. पालिकेकडून काही उपगरांतील विद्यार्थ्यांना बससुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र गेली पंधरा वर्षे पाठपुरावा करत असलेल्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप बस सुविधा उपलब्ध झालेली नाही. चिंचवड येथील उर्दू शाळेत सुमारे 350 विद्यार्थ्यांचा पट आहे. यामध्ये 80 टक्के विद्यार्थी कुदळवाडी, पवारवस्ती, चिखली येथून येतात.
थेट बससुविधा देण्यात यावी
चिंचवड व आकुर्डी येथील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ये - जा करताना दोन बस बदलाव्या लागतात. या विद्यार्थ्यांना चिंचवडवरून केबीसी चौकात यावे लागते. त्यानंतर भोसरी व आळंदीमार्गे जाणाऱ्या, चिखलीमार्गे जाणाऱ्या बसने घरापर्यंत असा प्रवास चिंचवड येथील विद्यार्थ्यांचा होतो. तर आकुर्डी येथील विद्यार्थ्यांना आकुर्डीवरून पिंपरीतील मोरवाडी चौकात एका बसने आणि तेथून पुन्हा चिखलीमार्गे बसने घरी असा प्रवास करावा लागतो. निदान शाळेच्या वेळेत तरी एकच थेट बससुविधा देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे.
बससाठी बजेट नसल्याचे कारण
पालिकेने रावेत, पुनावळे, यशवंतनगर, चऱ्होली, वडमुखवाडी येथील प्राथमिक शाळांना बस सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत; मात्र, उर्दू शाळा गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत असतानाही बससाठी सध्या बजेट नसल्याचे कारण सांगितले जाते. प्राथमिक शाळा असल्याने लहान लहान मुलांना त्यांच्या मोठ्या भावंडासोबत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.