Pimpri Chinchwad Tree Conservation Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Tree Conservation Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये झाडांचे ‘संरक्षण कवच’च ठरतेय घातक; लोखंडी जाळ्यांनी वाढ खुंटली

वृक्षारोपणानंतर देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप; अर्बन स्ट्रीट प्रकल्पातील झाडांचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहराला हिरवाईची झूल चढविण्याच्या उद्देशाने उद्यान विभागाने रस्त्यांच्या कडेला, दुभाजकांमध्ये आणि विविध चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. वृक्षारोपणाचे उद्घाटन, छायाचित्रे आणि प्रसिद्धी यानंतर मात्र या झाडांची देखभाल करणे वाऱ्यावर सोडल्याचे वास्तव समोर आले आहे. संरक्षणासाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक जाळ्यांनीच आज झाडांचा गळा आवळला असून, अनेक झाडांची वाढ खुंटली आहे. प्रशासनासाठी वृक्षारोपण हा फक्त एक कार्यक्रम होता की पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

संवर्धनकडे दुर्लक्ष

अर्बन स्ट्रीट प्रकल्पांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. उद्देश चांगला असला तरी त्यानंतरच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक झाडे संकटात सापडली आहेत. वाढलेल्या झाडांभोवतीची लोखंडी संरक्षक जाळी वेळेत काढली नसल्याने ती थेट बुंध्यावर आणि फांद्यांवर दाब देत आहेत. परिणामी झाडांचे खोड चिरले जात असून त्यांची नैसर्गिक वाढ खुंटत आहे.

संरक्षणासाठी लावलेले कवचच ठरत आहे घातक

सुरुवातीला जनावरे किंवा वाहनांपासून संरक्षण व्हावे, म्हणून लावण्यात आलेली लोखंडी जाळी आता झाडांसाठीच धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी झाडांचे बुंधे जाळीत अडकले आहेत. काही झाडांच्या फांद्या लोखंडी सळ्यांमध्ये अडकल्या आहेत. वेळेत देखभाल न झाल्यास ही झाडे भविष्यात कोमेजण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

लाखो रुपये खर्च… पण देखभालीचे काय ?

वृक्षारोपणासाठी दरवर्षी मोठा निधी खर्च केला जातो. मात्र, झाडे जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेली नियमित पाहणी, संरक्षक जाळी काढणे, छाटणी, पाणी आणि देखभाल याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिक करत आहेत. वृक्षारोपणाचा उद्देश केवळ आकडे वाढविणे नसून ती झाडे मोठी होणे आणि पर्यावरणाला हातभार लावणे हा आहे. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसत आहे.

उपाययोजना

  • शहरातील अर्बन स्ट्रीट प्रकल्पांतर्गत लावलेल्या सर्व झाडांचे तातडीने सर्वेक्षण करणे.

  • वाढलेल्या झाडांभोवतीची लोखंडी संरक्षक जाळी , अडथळे काढणे.

  • प्रत्येक झाडाची दर तीन महिन्यांनी पाहणी करून त्याची नोंद ठेवणे.

  • वृक्षसंवर्धनासाठी स्वतंत्र देखभाल पथक आणि जबाबदार अधिकारी नियुक्त करणे.

  • झाडांना नियमित पाणी, खत, छाटणी व रोगनियंत्रणाची व्यवस्था करणे.

  • मृत किंवा सुकलेल्या झाडांच्या ठिकाणी तातडीने नवीन रोपे लावणे.

  • वृक्षारोपणानंतर किमान तीन वर्षे देखभाल करणाऱ्या ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करणे.

  • प्रत्येक झाडाला क्रमांक देऊन त्याच्या देखभालीचा डिजिटल रेकॉर्ड ठेवणे.

  • निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे.

शहरातील सर्व वृक्षांची नियमित पाहणी केली जाते. ज्या ठिकाणी वाढलेल्या झाडांभोवतीची संरक्षक जाळी अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास येईल, त्या ठिकाणी ती तातडीने काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचीही दखल घेतली जाईल.
महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक तथा वृक्षाधिकारी उद्यान व संवर्धन विभाग
वृक्षारोपण करून प्रसिद्धी मिळविणे सोपे आहे; परंतु ती झाडे मोठी होईपर्यंत त्यांचे संगोपन करणे ही खरी जबाबदारी आहे. झाडांना वाचवण्यासाठी लावलेल्या लोखंडी जाळ्या त्यांच्या वाढीला अडथळा ठरत असेल, तर अशा जाळ्या दूर करणे गरजेचे आहे.
भरत इंगवले, स्थानिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT