

पिंपरी: एमआयडीसी परिसरात कामासाठी आलेल्या परराज्यातील कामगारांना एकटे गाठून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. या कारवाईमुळे महाळुंगे आणि भोसरी एमआयडीसी परिसरातील लुटमारीच्या तीन गुन्ह्यांची उकल झाली असून, आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. केशव दशरथ शेटे (४६, रा. पिंपरी गाव) आणि राजेश अनिल कुमार (४५, रा. ताडीवाला रोड, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी महाळुंगे-तळवडे रस्त्यावर महिंद्रा कंपनीसमोर दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी एका परराज्यातील कामगाराला अडवले. त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून त्याचे लॉक उघडण्यात आले. त्यानंतर मोबाईलमधील ऑनलाईन पेमेंट सुविधेचा वापर करून २५ हजार रुपये आरोपींकडे असलेल्या मोबाईलमधील क्यूआर कोडवर वर्ग करण्यात आले. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून सुरू होता. तपासादरम्यान आरोपींनी पैसे स्वीकारण्यासाठी वापरलेला मोबाईल फोनदेखील चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच ऑनलाईन मिळालेली रक्कम वेगवेगळ्या मनी ट्रान्सफर केंद्रांतून रोख स्वरूपात काढून घेतली जात असल्याने आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते.
दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप सावंत यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे आणि पोलिस शिपाई प्रशांत सैद यांनी घटनास्थळासह विविध मनी ट्रान्सफर केंद्रांतील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख निश्चित करण्यात आली. त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आणखी तीन साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली.
तपासात आरोपींची कार्यपद्धतीही समोर आली आहे. महाळुंगे एमआयडीसीतील परराज्यातील कामगारांवर ते आधीपासून पाळत ठेवत असत. गुरुवार आणि रविवार या दिवशी बहुतांश कामगारांना सुट्टी असल्याने ते एकटे बाहेर पडतात, याची माहिती आरोपींना होती. या दिवशी एकट्याने चालत जाणाऱ्या कामगारांना अडवून त्यांना धमकावले जात असे. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमधून किंवा रोख स्वरूपात पैसे घेतले जात. ऑनलाईन व्यवहार झाल्यास ती रक्कम तातडीने मनी ट्रान्सफर केंद्रातून रोख स्वरूपात काढून घेतली जात असल्याने बँक व्यवहारांचा मागोवा घेऊन पोलिसांनी पकडू नये, असा आरोपींचा प्रयत्न होता.