वर्षा कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक सिमेंट व डांबरी रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती पुरेशी मोकळी जागा न सोडल्याने अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. बुंध्याभोवतीची जागा मोकळी न ठेवल्याने झाडाचा श्वास कोंडू लागला आहे.
शहरात तब्बल 32 लाख झाडे असल्याचे पालिकेने केलेल्या वृक्षगणनेतून उघड झालेले आहे. मात्र, झाडाच्या बुंध्याला एक मीटर चौरस माती असायला हवी. परंतु, शहरात ठिकठिकाणी झाडांना सिमेंट काँक्रीटचे आवरण केले जात आहे. अनेक झाडांना चक्क बांधकामातील मलब्याचे खाद्य पुरविण्यात येत आहे. त्यामुळे ही झाडे जगणार कशी? रस्ते सुशोभीकरणासाठी केलेले काम फक्त दिखावा ठरत आहे.
सिमेंट, डांबरी रस्त्यांची कामे असो की अर्बन स्ट्रीटनुसार, पदपथ विकसित करताना रस्त्यालगत असलेल्या बहुतांश झाडांच्या बुध्याभोवती कंत्राटदाराने सिमेंटचे आवरण केल्याचे सर्रास दिसत आहे. यामुळे झाडांना पाणी टाकता येत नाही. मुळांना व्यवस्थित पाणी मिळत नसल्याने झाडांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे काही झाडे मरणासन्न अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वृक्षप्रेमी नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
झाडे जगणे ही काळाची गरज असून, पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचे आहे. राज्य शासन, स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक पातळीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवितात. मात्र, वृक्ष संवर्धनासाठी योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याचे वास्तव या प्रकारावरून दिसून येत आहे.
झाडांच्या मुळांना माती हवी असते. त्यांच्या मुळाशी सिमेंट म्हणजे झाडांसाठी एकप्रकारे विषच आहे. त्यामुळे झाडे मरूही शकतात, अशी शक्यता काही पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. झाडांचा जीव घेऊ पाहणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही वृक्ष प्रेमीतून होऊ लागली आहे. मोशी येथील लक्ष्मी चौकात पदपथावर झाडाला लावलेली जाळी झाडासह खाली पडली आहे. याठिकाणी झाडाच्या बुंध्याभोवती माती कमी झाली आहे. अशा परिस्थितीतही झाड आपले अस्तित्व टिकवून आहे. मात्र, जाळी पडल्याने त्याची वाढ खुंटत आहे.
चिखली स्पाईन रोडला पदपथाबाजूस लावलेली झाडे पाणी न मिळाल्याने पूर्णपणे सुकली आहे. झाडांच्या संरक्षणासाठी येथे झाडांचा जाळी बसविण्यात आली असली तरी पाण्याविना झाडे मरून जात आहेत. केएसबी चौकातदेखील पदपथावर झाडांच्या मुळाशी राडारोडा टाकण्यात आला आहे. जाधववाडी मोशी याठिकाणीदेखील झाडाच्या बुंध्याजवळ खोड वाढण्यासाठी जागाच ठेवली नसल्याचे चित्र आहे.
शहरात ज्या ठिकाणी अशा प्रकारे झाडांची अवस्था झाली आहे. अशा झाडांची पाहणी करण्यात येईल. त्या झांडांना जगविण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील.महेश गारगोटे (सहाय्यक आयुक्त उद्यान विभाग)
आता नव्याने रस्ते, पदपथ विकसित करताना झाडांच्या लागवड करताना बुंध्याच्या बाजूने सिमेंटचे आवरण बनविले जात आहे. त्यामुळे वृक्षलागवड करायची, पण झाड जगले का नाही हे बघायचे नाही, असे प्रकार वाढत आहेत. प्रत्येक वृक्षावर गणना क्रमांक, त्याची जाती, अंदाजे वय किती, असे माहिती देणारे फलकदेखील कुठेच नाहीत.आण्णा जोगदंड (वृक्षप्रेमी नागरिक)