Pimpri Chinchwad Birthday Celebration Ban: ‘भाई का बर्थडे‌’ साजरा करताना फटाके, गोंधळ वर बंदी

मध्यरात्री फटाके फोडणे, मोठा आवाज आणि गर्दीवर पोलिसांचे निर्बंध; उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई
Birthday Celebration
Birthday CelebrationPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात मध्यरात्री ‌‘भाई का बर्थडे‌’च्या नावाखाली रस्त्यावर फटाके फोडणे, मोठ्या आवाजात डीजे लावणे, मित्रमंडळींची गर्दी करून गोंधळ घालणे; तसेच तलवारीने केक कापून वाढदिवस साजरे करण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक पावले उचलली असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिला आहे.

Birthday Celebration
PMRDA Projects Stalled: पीएमआरडीएचे सात मोठे प्रकल्प अजूनही रखडले

पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाकडून महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1) अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा निवासी भागात मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे, आतषबाजी करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वाढदिवस साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मागील काही वर्षांत वाढदिवस साजरे करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. काही ठिकाणी मध्यरात्री रस्त्यावर केक कापणे, वाहनांचे ताफे काढणे, फटाके फोडणे किंवा मोठ्या आवाजात संगीत लावून परिसरात गोंधळ घालण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. अनेकदा अशा कार्यक्रमांमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत होते. तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Birthday Celebration
PCMC Administration After Election: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामकाजाला गती

सोशल मीडियामुळे वाढला ट्रेंड

मागील काही वर्षांत सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा मित्रमंडळींमध्ये प्रभाव दाखवण्यासाठी वाढदिवस साजरे करण्याची पद्धत बदलली आहे. काही ठिकाणी मध्यरात्री रस्त्यावर केक कापणे, वाहनांचे ताफे काढणे, फटाके फोडणे किंवा मोठ्या आवाजात संगीत लावून परिसरात गोंधळ घालताना मोबाईलमध्ये चित्रीकरण केले जाते. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो, तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो.

रुग्णालय, रहिवासी भागात विशेष लक्ष

पोलिसांच्या आदेशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत फटाक्यांची आतषबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालय परिसर आदी संवेदनशील ठिकाणांच्या 100 मीटर परिसरात फटाके फोडण्यास बंदी आहे. 125 डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

Birthday Celebration
Postal Life Insurance Scheme: टपाल जीवन विमा योजनेचा प्रचार; पोस्टमनमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचणार सेवा

शस्त्रांचे प्रदर्शन येईल अंगलट

अलीकडे काही वाढदिवस समारंभांमध्ये तलवारी, चाकू किंवा अन्य धारदार शस्त्रांचा वापर करून केक कापण्याचे प्रकार वाढले आहेत. सोशल मीडियावर दहशत पसरवून वर्चस्व निर्माण करण्यासाठी अशा प्रकारांचे व्हिडिओही प्रसारित होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारे केक कापल्यास संबंधितांवर शस्त्र कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांकडून आवाहन

शहरात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून रात्रीच्या वेळी विशेष गस्त, नाकाबंदी आणि पेट्रोलिंग वाढवण्यात येणार आहे. मध्यरात्री रस्त्यावर गर्दी करून वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर पोलिसांकडून तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी वाढदिवस साजरा करताना कायद्याचे पालन करावे आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Birthday Celebration
Maval Metro Project: मावळात मेट्रो कधी येणार?

धोकादायक फटाक्यांवर बंदी

पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार काही धोकादायक फटाक्यांवर स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. विशेषतः आपटी बार (फेकण्याचे फटाके) व सुतळी बॉम्ब यांसारख्या फटाक्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ज्या फटाक्यांचे वजन 21 ग््रॉमपेक्षा जास्त, लांबी 3.8 सेंटिमीटरपेक्षा अधिक आणि व्यास 1.99 सेंटिमीटरपेक्षा जास्त आहे, अशा प्रकारच्या फटाक्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय 125 डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणारे फटाके वापरण्यास मनाई आहे. तसेच 10 फूटपेक्षा जास्त लांबीची फटाक्यांची माळ लावण्यासही बंदी करण्यात आली आहे. फटाक्यांमुळे मानवी जीवितास किंवा मालमत्तेला धोका निर्माण होईल अशा प्रकारे आतषबाजी करण्यासही मनाई असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वाढदिवस साजरे करणे ही वैयक्तिक बाब असली तरी त्यातून सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू नये. मध्यरात्री फटाके फोडणे, रस्त्यावर गर्दी करणे किंवा शस्त्रांचा वापर करून केक कापणे अशा प्रकारांना पोलिसांकडून अजिबात सहन केले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news