पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने टेरेकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेड या खासगी एजन्सीमार्फत सॅटेलाईटद्वारे शहरातील झाडांची मोजणी केली होती. शहरात तब्बल 32 लाख 16 हजार 799 वृक्ष असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यासाठी महापालिकेने तब्बल 6 कोटी 76 लाख रुपये खर्च केले. ते वृक्ष मोजणीचे काम वादात सापडले होते. आता पुन्हा या प्रकारे शहरातील झाडांची गणना केली जाणार आहे. त्याच निविदा उद्यान विभागाने प्रसिद्ध केली आहे.
शहरातील वृक्ष गणना करण्यास स्थायी समितीने 27 सप्टेंबर 2017 ला मान्यता दिली होती. ते संपूर्ण काम सात वर्षात पूर्ण झाले नाही. मात्र, ठेकेदार एजन्सीचे बिल अदा करण्यात आली. त्या एजन्सीनुसार शहरात 32 लाख 16 हजार 977 झाडे असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. एका झाडासाठी दहा रुपये खर्च करण्यात आला. त्यापूूर्वी 2003 -04 मध्ये मानवी पद्धतीने वृक्षगणना करण्यात आली होती. एका झाडाची मोजणी करण्यासाठी दोन रुपये 35 पैसे देण्यात आले होते. एकूण 39 लाख रुपये खर्च आला होता.
आता, पुन्हा झाडांची मोजणी केली जाणार आहे. शहरातील झाडांची जीआयएस किंवा जीपीएस आधारित (भौगोलिक सूचना प्रणाली) मॅपिंग करून त्यांची संख्या मोजणीसाठी एजन्सी नेमण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक एजन्सीकडे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यासाठी 9 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागण्यात आले आहेत. शहरातील वृक्षांची गणना करण्यासाठी पुन्हा कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
मागील काम ठरले वादग्रस्त...
टेराकॉन इकोटेक प्रा. लि या ठेकेदाराला उपग्रहाद्वारे वृक्षगणना करण्याचे काम देण्यात आले होते. दोन वर्षात वृक्षगणना पूर्ण करायची आहे. उर्वरित तीन वर्षांमध्ये किती झाडे तोडली, नवीन किती लावली याचे गणना त्यांनी ठेवायचे आहे. झाडांचे टिपलेले छायाचित्र महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार. मोबाईल अॅप विकसित करण्यात येणार होते. सॅटेलाईटद्वारे झाडांची उंची, रुंदी, त्यामधील गर, त्याचे ठिकाण, झाडांची स्थिती, नंबरींग, वृक्षारोपणाची व्याप्ती याची सर्व माहिती जमा केली जाणार आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे न झाल्याने विरोधकांनी कामाबाबत अनेक आरोप केले. त्याबाबत उद्यान विभागाने एजन्सीला नोटीस बजावली होती. मात्र, त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही.
वृक्षगणनेमुळे शहरातील झाडांची सर्व प्रकाराची माहिती उपलब्ध होणार
पिंपरी-चिंचवड शहरातील झाडांची दर दहा वर्षांनी मोजणी केली जाते. यंदाच्या वर्षी ही मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करून इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागण्यात आले आहेत. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यास शहरातील झाडांची सर्व प्रकाराची माहिती उपलब्ध होणार आहे, असे महापालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे यांनी सांगितले.
मागील आकडेवारीनुसार शहरातील झाडांची संख्या
क्षेत्रीय कार्यालय: वृक्ष संख्या
अ: 3 लाख 6 हजार 94
ब: 4 लाख 62 हजार 137
क: 3 लाख 51 हजार 173
ड: 5 लाख 12 हजार 368
ई: 8 लाख 43 हजार 824
फ: 7 लाख 41 हजार 203
एकूण: 32 लाख 16 हजार 799