Traffic Signal Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Traffic Signal Discipline: सिग्नलवर नियम पाळणाऱ्यांनाच त्रास! पिंपरी-चिंचवडमध्ये हॉर्नबाजी आणि दादागिरीचा वाढता प्रकार

लाल सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांवर दबाव; महिला आणि ज्येष्ठ नागरिक त्रस्त, वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांनाच आता मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. सिग्नल लागल्यानंतर तेथे थांबवणाऱ्या वाहनचालकांना मागून येणाऱ्या काही वाहनचालक सतत हॉर्न वाजवणे, हातवारे करणे, ओरडणे आणि पुढे जाण्यासाठी दबाव टाकणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे वाहतूक नियम पाळणारा चालकच अडथळा, अशी मानसिकता सर्रास बळावत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

सिग्नलवर थांबणे हा वाहतुकीचा मूलभूत नियम आहे. मात्र, शहरात आता नियम पाळणाऱ्यांनाच कर्कश्श हॉर्न वाजवणे तसेच शिवीगाळ करून वाहतूक नियम मोडण्यास उद्युक्त केले जाते. काही वाहनचालकांची ही वाढती मुजोरी वेळेत न रोखल्यास शिस्तीबरोबरच नागरिकांची सुरक्षितताही धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

लाल दिवा लागल्यानंतर समोरची वाहने थांबलेली असतानाही मागून कर्कश हॉर्नचा मारा सुरू होतो. काहीजण वाहन अगदी जवळ आणून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, तर काही चालक हातवारे करत किंवा शिवीगाळ करत नियम पाळणाऱ्यांवरच दबाव आणतात. एवढेच नव्हे, तर काहीजण सिग्नलचे उल्लंघन करून पुढे निघून जातात.

या प्रकारामुळे वाहतूक शिस्तीला तडा जात असून, अपघाताचा धोका वाढत आहे. विशेषतः चौकातून उजवीकडे किंवा डावीकडे वळणाऱ्या वाहनांसाठी ही घाई जीवघेणी ठरू शकते. काही सेकंदांच्या उतावळेपणामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता वाहतूक तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

हॉर्नचा इशारा नव्हे, दबावाचे हत्यार

वाहनाचा हॉर्न हा केवळ इशारा देण्यासाठी असतो. मात्र, शहरातील अनेक चौकांमध्ये त्याचा वापर पुढील वाहनचालकावर मानसिक दबाव टाकण्यासाठी होत असल्याचे दिसते. लाल सिग्नल असतानाही सतत हॉर्न वाजवून समोरील चालकाला गाडी पुढे घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अनेक चालक गोंधळून नियमभंग करतात.

महिला, ज्येष्ठ नागरिक अधिक त्रस्त

सततचा हॉर्न, आक्रमक हावभाव आणि दबावामुळे महिला तसेच ज्येष्ठ नागरिक अधिक अस्वस्थ होतात. अनेकदा ते घाबरून चुकीचा निर्णय घेतात. काही महिला चालकांनी तर केवळ मागील वाहनांच्या दबावामुळे सिग्नल सुटण्यापूर्वीच वाहन पुढे घेतल्याचे सांगितले.

काय करावे?

  • प्रमुख चौकांवर वाहतूक पोलिसांची उपस्थिती वाढवावी.

  • विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांवर नियमित कारवाई करावी.

  • सिग्नल शिस्तीबाबत जनजागृती मोहीम राबवावी.

  • सीसीटीव्हीच्या माध्यमातून सिग्नल तोडणाऱ्यांवर आणि हॉर्नबाजी करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण.

मी सिग्नलवर नियमाप्रमाणे थांबतो. मात्र मागून येणारे काही वाहनचालक इतक्या आक्रमकपणे हॉर्न वाजवतात की आपणच चुकीचे आहोत का, असा प्रश्न पडतो. वाहन अगदी जवळ आणणे, हातवारे करणे, ओरडणे असे प्रकार वारंवार घडतात. नियम पाळणाऱ्यांनाच त्रास सहन करावा लागतो.
नवनाथ कोरे, वाहनचालक
सिग्नलवर थांबल्यावर मागून सतत हॉर्न आणि आक्रमक वर्तनामुळे भीती वाटते. काही वेळा त्या मानसिक तणावामुळे सिग्नल सुटण्यापूर्वीच गाडी पुढे घ्यावीशी वाटते. अशा परिस्थितीत सुरक्षितपणे वाहन चालवणे कठीण होते.
मोनिका पाटील, दुचाकीस्वार
सिग्नल तोडणे आणि विनाकारण हॉर्न वाजवणे हे दोन्ही प्रकार दंडनीय आहेत. अनावश्यक हॉर्न वाजविल्यास ५०० रुपये, तसेच सिग्नल तोडल्यास ५०० रुपयांचा दंड आहे. पुन्हा नियमभंग केल्यास वाढीव दंड आकारला जातो. मॅाडिफाय केलेले प्रेशर हॅार्न लावणाऱ्या वाहनांवरही कारवाई करत आहोत. आम्ही सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही कारवाई करत आहोत.
अमित डोळस, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT