Students Stranded Dubai Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Students Stranded Dubai: दुबईत अडकलेले पिंपरी-चिंचवडचे 84 विद्यार्थी सुखरूप परत

युद्धसदृश परिस्थितीत विशेष विमानातून भारतात आगमन; कुटुंबीयांनी व्यक्त केला दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: इस्रायल, अमेरिका व इराण यांच्यात संघर्ष पेटल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे येथील इंदिरा विद्यापीठाचे 84 विद्यार्थी दुबई येथे अडकले होते. अखेर विशेष विमानाच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी सुखरूप शहरात परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

इस्रायल, अमेरिका व इराण देशात 28 फेबुवारीपासून युद्ध पेटले आहे. युद्धामुळे भारतातून दुबईला जाणारी तसेच तेथून येणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहे; मात्र, शिक्षणासाठी दुबईला गेलेली आपली मुले कशी येणार, या विचाराने पालक घाबरले होते. यामध्ये दहा शिक्षकांचाही समावेश होता. त्यामुळे सर्वांचे कुटुंबीय मोठ्या तणावात होते.

युद्धाची परिस्थिती आणि क्षेपणास्त्रांचा होणारा मारा या बातम्या ऐकून विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी वाढत होती. यावेळी इंदिरा विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर यांच्याकडून फोन, पत्रव्यवहार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्रालय, गृहमंत्रालय अशा सर्व स्तरांवर पाठपुरावा सुरू होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर बातमी पडताच त्यांच्या कार्यालयातून तत्काळ संपर्क साधण्यात आला. दुबईतील महाराष्ट्र मंडळाचे सोमनाथ पाटील विद्यार्थ्यांच्या हॉटेलवर पोहोचले. व्हिडीओ कॉलवर उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत मी तुम्हाला सुरक्षित परत आणतो, अशी खात्री दिली. त्या एका वाक्याने विद्यार्थ्यांना धीर मिळाला.

अवघ्या 24 तासांत त्यांनी वैयक्तिक पुढाकार घेत चार्टर विमानाची व्यवस्था केली. आवश्यक परवानग्यांसाठी परराष्ट्र मंत्रालय, गृहमंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि युएई प्रशासनाशी समन्वय साधला गेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक पातळीवर घेतलेला पुढाकार आणि विविध मंत्रालयांनी दिलेले सहकार्य यामुळे 84 कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे रंग परतले, संध्याकाळी सात वाजता दुबईवरून फ्लाईटने उड्डाण केले आणि पुण्यातील पालकांच्या जीवात जीव आला. मुंबई विमानतळावर विद्यार्थी उतरले त्यांना पाहून पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 48 तासांची भीती, अनिश्चितता आणि काळजी एका क्षणात विरली.

आमच्याकडे जेवढी उपलब्ध आकडेवारी होती. त्यानुसार विद्यार्थी शहरात परतले आहेत. उर्वरित विद्यार्थी लवकरच भारतात परततील.
ओमप्रकाश बहिवाल (आपत्ती व्यवस्थापन अधिकारी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT