Stray Dogs Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Stray Dogs: पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिक, विद्यार्थी दहशतीत

कुदळवाडी-जाधववाडीत कुत्र्यांच्या झुंडींचा वावर; कचऱ्यामुळे समस्या गंभीर, वाहनचालकांच्या अपघाताचा धोका वाढला

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विविध भागांत कुत्र्यांमुळे वाहनचालकांना अपघात, लहान मुलांवर झुंडीने हल्ला करण्याचे प्रकार शहरात घडले आहेत. तरीदेखील गेंड्याच्या कातडीचे प्रशासन केवळ कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. आज शहराच्या कोणत्याही भागांत गेले तरी मोकाट कुत्र्यांनी नागरिकांचे जगणे मुश्कील केले आहे. कुदळवाडीत मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. परंतु, महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

कुदळवाडी, जाधववाडी, बालघरे वस्ती तसेच चिखली, देहू-आळंदीरोड आदी भागांत मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग वास्तव्यास आहे. तसेच महापालिकेच्या व इतर खासगी शाळांत मोठ्या प्रमाणावर पायी ये-जा करत शाळांत प्रवेश करणाऱ्र्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. ते रस्त्याने प्रवास करताना मोकाट कुत्री अचानक अंगावर धावून येत आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

कचऱ्यामुळे पशु-पक्ष्यांचा वाढला वावर

कुदळवाडी येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे आहेत. ते वेळेत उचलले जात नाहीत. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांचा, कावळे तसेच इतर पक्ष्यांचा वावर वाढला आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्र्यापासून प्रवास करताना नागरिकांना, लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

घंटागाडी अन्‌ कामगारांचा बसेना मेळ

कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार नाक्यावर काम करणारे नागरिक वास्तव्यास आहेत. ते पहाटपासून घराबाहेर पडतात. यामुळे महापालिकेकडून कचरा संकलन करण्यासाठी येणारी घंटागाडीचा वेळ आणि त्यांचा वेळ यांचा ताळमेळ बसत नसल्याने बहुतांश महिला रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. यामुळेदेखील मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे.

वाहनचालक, नागरिकांना अपघाताचा धोका

कुदळवाडीतील बहुतांश भागांत रस्त्याची कामे मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. परंतु, अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे मुळातच वाहनचालक, नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यातील खड्डे, रखडलेले डांबरीकरण, अर्धवट रस्ते आणि त्यात कचरा, मोकाट कुत्री नागरिक, वाहनचालकांच्या अंगावर धावून येत असल्याने वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडत आहेत. यामुळे येथील समस्यांची पाहणी करून समस्यांतून सुटका करावी.

कुदळवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कुदळवाडी, जाधववाडी परिसरात कामगारवर्ग, सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्‍तव्यास आहेत. दिवसा, रात्री रस्‍त्‍याने प्रवास करणाऱ्या नागरिकांवर, लहान मुले, ज्‍येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्‍या अंगावर ही मोकाट कुत्री धावून येत आहेत. तरी महापालिकेच्‍या पशुवैद्यकीय विभागाने येथील कुत्र्यांचा त्‍वरित बंदोबस्‍त करावा.
दिनेश यादव, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पिं. चिं. शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT