Dogshed Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Stray Dogs: पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; डॉगशेड अपुरे

शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे एक लाख, नसबंदी व उपचार व्यवस्थेवर ताण

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. शहर परिसरात लोकवस्तीदेखील वाढली आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे भटक्या कुत्र्यांचीही संख्या वाढलेली आहे. भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने नागरिकांवर आणि लहान मुलांवर हल्ला केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने नेहरूनगर येथे मोकळ्या जागेत डॉग शेड उभारले आहेत. यामध्ये एक आजारी कुत्र्यांसाठी आणि दुसरे नसबंदी केलेल्या कुत्र्यांसाठी अशी वेगळी व्यवस्था आहे. मात्र, हे डॉगशेड कुत्र्यांच्या संख्येच्या मानाने अपुरे पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री अजूनही रस्त्यावर दिसून येत आहेत.

शहरात सुमारे एक लाख भटकी कुत्री

शहरात एक लाखाच्या आसपास भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेले भटके कुत्रे पकडून निवारागृहात ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महापालिकेकडे डॉगशेड अपुरे असल्याने या कुत्र्यांना कोठे ठेवायचे, असा प्रश्न महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागासमोर निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यांचे असे काही विशिष्ट ठिकाण नसते. काही हिंस्त्र श्वान नागरिकांचा चावा घेतात. शाळा, महाविद्यालये, कार्यालये याठिकाणी भटकी श्वान असतात. हे श्वान धावून आल्यास व्यक्ती आपल्या जीव वाचविण्यासाठी पळापळ करतात. अशावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

भटक्या श्वानांची संख्या हजारोमध्ये कॅनल फक्त 216

शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. नेहरूनगर येथील डॉगशेडमध्ये नसबंदीचे 216 कॅनल आहे. आजारी श्वान ठेवण्यासाठी 50 कॅनल आहे. यामध्ये नसबंदीसाठी आणलेल्या श्वानांना पाच दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येते. त्यानंतर त्यांना शहरातच सोडले जाते. कॅनलची संख्या कमी असल्याने दररोज नसबंदी केलेल्या श्वानांचे कॅनल फूल असतात. त्यामुळे जसे कॅनल रिकामे होतील तसे कुत्र्यांना नसबंदी करण्यासाठी आणले जाते. कॅनल कमी असल्याने नसबंदी करण्याचे काम वेळखाऊ होते. त्यामुळे त्यांच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवता येत नाही. तसेच आजारी श्वानांसाठी 50 कॅनल आहेत. श्वान बरे होईपर्यंत त्याला उपचारासाठी तिथेच ठेवले जाते.

उघड्यावर फेकलेल्या शिळ्या अन्नावर ताव

शहरातील पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेते, मांस, चिकन विक्रेते व हॉटेल व्यावसायिक तसेच, रहिवासी गटार किंवा उघड्यावर शिल्लक व शिळे अन्नपदार्थ फेकून देतात. त्यामुळे मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा दावा पशुवैद्यकीय विभागाचा आहे. रात्रीच्या वेळी वाहने व पादचाऱ्यांवर कुत्री धावून जातात. कुत्रे अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी वाहनचालक वाहन वेगात चालवितात. त्याप्रसंगी अपघात होतात. रात्री रस्त्यांवरुन जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. कुत्र्यांच्या चाव्यामुळे तसेच, अपघात होऊन जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. लहान मुलांवर हल्ला करून चावे घेण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे.

सध्या शहरात नेहरूनगर येथे श्वानांच्या नसबंदीचे 216 आणि आजारी श्वानांसाठी 50 कॅनल आहेत. कॅनल जसे रिकामे होतील तसे नसबंदी करून श्वानास पाच दिवस ठेवले जाते, नंतर सोडून देण्यात येते. तसेच आजारी कुत्रे जोपर्यंत बरे होत नाही, तोपर्यंत त्यांना ठेवावे लागते.
डॉ. अरुण दगडे (पशुवैद्यकीय अधिकारी, पिं.चिं.मनपा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT