ST Bus pudhari photo
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad ST Special Buses: कोकणच्या चाकरमान्यांसाठी एसटीची ‘गणेश’वारी; वल्लभनगर आगारातून ५८ विशेष बस धावणार!

गट आरक्षणाच्या ३६, नियमित आरक्षणाच्या २२ गाड्या; गर्दी वाढल्याने आणखी ७ फेऱ्यांचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुविधेसाठी राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. पिंपरी- चिंचवड (वल्लभनगर) आगारातून गेल्या दोन दिवसांत कोकणासाठी एकूण ५८ विशेष बस गाड्या सोडण्यात येत आहेत. यामध्ये ३६ गाडया गट आरक्षणच्या ( ग्रुप बुकिंग), तर २२ गाडया नियमित आरक्षणाच्या आहेत.

तसेच वाढती गर्दी लक्षात घेऊन आणखी ७ फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. शुक्रवार (दि.११) ग्रुप बुकिंग केलेल्या सहा गाड्या आणि आरक्षित अकरा अशा १७ गाडया सोडण्यात आल्या. शानिवार ( दि.१२ ) प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्याने ३० ग्रुप बुकिंग आणि ११ आरक्षित अशा एकूण ४१ बस कोकणाकडे मार्गस्थ झाल्या.

या विशेष गाडया कोकणातील सावंतवाडी, दापोली, पोफळी, चिपळूण, परचुरी, मालवण, लांजा, दोडामार्ग आणि खेड या प्रमुख मार्गांवर धावत आहेत. मागील काही काळापूर्वी लागू केलेली ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आली आहेत.

ग्रुप बुकिंगला प्रतिसाद

गणेशोत्सवात एकाच गावातील प्रवशांना एकत्र प्रवास करण्यासाठी गट आरक्षणचा मोठा फायदा होतो. यामुळे संपूर्ण बस आपल्या सोयीनुसार आणि इच्छित वेळेत ठरवून घेता येते. एकाच वेळी संपूर्ण ग्रुपचे बुकिंग सहज शक्य होत असल्याने बसस्थानकावरील रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचतो आणि संपूर्ण कुटुंबाचा किंवा सहकाऱ्यांचा प्रवास अधिक सोयिस्कर होतो.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एस.टी. महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. तसेच प्रवाशांच्या मागण्यांनुसार ग्रुप बुकिंग आणि जादा गाडयांचे नियोजन केले जात आहे. त्यासह भाडेदरावर सवलत देण्यात येत आहे.
वैशाली कांबळे, स्थानक प्रमुख, वल्लभनगर आगार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT