Pimpri Chinchwad Snake Sightings Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Snake Sightings: पिंपरी-चिंचवडमध्ये सापांचे दर्शन वाढले; मिलन हंगामामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाग-धामण जोडी आढळण्याच्या घटना वाढल्या; साप मारू नका, सर्पमित्रांना संपर्क करा

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: चिंचवड येथील केशवनगर या भागामध्ये एका नागरिकाच्या व्हरांड्यामध्ये नागाची जोडी आढळून आली; तसेच चऱ्होलीतील एका सोसायटीमध्ये एकाच वेळी तीन साप आढळले. तिरूपती सोसायटीमध्ये नाग आढळला. साप दिसण्याच्या घटनांमुळे शहरामध्ये दररोज सर्पमित्रांना 10 ते 15 कॉल येत आहेत. शहरी वस्तीमध्ये साप दिसू लागल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मार्च ते जून हा काळ सापांच्या मिलनाचा असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन सर्पमित्रांकडून केले जात आहे.

उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच निसर्गात अनेक बदल घडू लागतात आणि वन्यजीवांच्या जीवनचक्रातही महत्त्वाचे टप्पे सुरू होतात. याच काळात सापांच्या अनेक प्रजातींमध्ये प्रजनन (मेटिंग) हंगाम सुरू होतो. विशेषतः धामण आणि नाग या सर्प प्रजातीमध्ये मार्च ते जूनदरम्यान मेटिंगचा काळ असतो. तापमान वाढ, दिवसाची लांबी वाढणे आणि अन्नाची उपलब्धता या सर्व घटकांमुळे साप अधिक सक्रिय होतात. त्यामुळे ते जोडीदार शोधण्यासाठी त्यांच्या बिळांमधून बाहेर पडतात आणि मानवी वसाहतींच्या जवळही दिसू लागतात.

धामण हा भारतात मोठ्या प्रमाणात आढळणारा बिनविषारी साप आहे. त्याची लांबी 6 ते 10 फुटांपर्यंत असू शकते. तो अतिशय वेगवान आणि चपळ असतो. धामण प्रामुख्याने उंदीर, पाल, बेडूक, पक्ष्यांची अंडी यांवर उपजीविका करतो. त्यामुळे शेतीसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरतो. मेटिंगच्या काळात नर मादीसाठी स्पर्धा करतात. या स्पर्धेला कॉम्बॅट डान्स असे म्हणतात, ज्यामध्ये दोन नर एकमेकांभोवती वेटोळे घालून उभे राहण्याचा प्रयत्न करतात. हे दृश्य पाहताना अनेकांना ते भांडत आहेत असे वाटते; परंतु प्रत्यक्षात ही एक नैसर्गिक स्पर्धा असते. या प्रक्रियेनंतर मादी सुरक्षित ठिकाणी अंडी घालते आणि काही आठवड्यांत त्यातून पिल्ले बाहेर पडतात.

मादी करते अंड्यांचे रक्षण

नाग हा विषारी असून भारतातील सर्वात ओळखता येणाऱ्या सापांपैकी एक आहे. त्याच्या फण्यामुळे तो सहज ओळखता येतो. नाग प्रामुख्याने उंदीर, बेडूक आणि इतर लहान प्राण्यांवर उपजीविका करतो. मेटिंगच्या हंगामात नर हे मादीसाठी स्पर्धा करतात आणि या काळात ते अधिक वेळा दिसतात. विशेष म्हणजे मादी अंडी घातल्यानंतर काही काळ त्यांचे रक्षण करते, जे सापांमध्ये दुर्मिळ वर्तन मानले जाते. साधारणतः 15 ते 30 अंडी घालून ती त्यावर लक्ष ठेवते, ज्यामुळे पिल्लांचे संरक्षण होते.

थंड वातावरणाची जागा शोधण्यासाठी मानवी वस्तीत वावर

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे साप थंड जागा शोधण्यासाठी घरांच्या आसपास, पाण्याच्या ठिकाणी, बागेत किंवा शेतात दिसू शकतात. अनेक वेळा पाण्याच्या शोधात किंवा शिकार करताना ते मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते. परंतु, बहुतांश वेळा साप माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात आणि फक्त धोका वाटल्यासच बचावासाठी हल्ला करतात.

साप पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक

या काळात सापांचे दर्शन वाढल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन साप मारण्याचा प्रयत्न करू नये. साप हे पर्यावरणाच्या साखळीतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. ते उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवून शेतीचे नुकसान टाळतात आणि रोगांचा प्रसार कमी करतात. साप नष्ट झाल्यास पर्यावरणातील समतोल बिघडू शकतो.

त्यांना मारू नका; सर्पमित्रांशी संपर्क साधा साप दिसल्यास स्थानिक सर्पमित्र, वनविभाग किंवा अधिकृत रेस्क्यू टीमशी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे. साप पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न केल्यास अपघात होऊ शकतो. तसेच घराच्या आसपास स्वच्छता राखणे, कचरा साचू न देणे, उंदीर नियंत्रणात ठेवणे आणि रात्री बाहेर पडताना काळजी घेणे या गोष्टी केल्यास साप येण्याची शक्यता कमी होते.

सापांच्या मिलनाचा काळ असल्याने साप आढळल्याचे दिवसाला 15 पेक्षा जास्त कॉल येतात. यामध्ये बहुतांश ठिकाणी नर मादी अशी जोडी सापडते. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. सापांविषयी असलेले गैरसमज दूर करून त्यांचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे.
शुभम पांडे (अध्यक्ष, वर्ल्ड फॉर नेचर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT