बजरंग मासाळ
पिंपरी: पावसाळा सुरू होताच शहर आणि परिसरात साप दिसण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. मात्र, शहरातील महापालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमध्ये भेट दिली असता अनेक ठिकाणी सर्पदंशावरील जीवनरक्षक ‘ॲन्टिवेनम’ औषध उपलब्ध नसल्याचे संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, यामागे औषध देण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ, आपत्कालीन उपचार सुविधा, रुग्ण निरीक्षण व्यवस्थेचा अभाव दिसत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना सर्पदंश उपचाराची सुविधा असलेल्या मोठ्या रुग्णालयांकडे पाठविण्यात येत आहे.
ॲन्टिवेनम ठेवणे म्हणजे फक्त औषध ठेवणे नव्हे
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्राथमिक आयोग्य केंद्र आणि दवाखान्यात केवळ औषधाचा साठा पुरेसा नसतो. त्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर, आपत्कालीन उपचार व्यवस्था, रुग्ण निरीक्षण सुविधा, ऑक्सिजन, अतिदक्षता उपचारांची तयारी आणि संभाव्य रिऍक्शन हाताळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक असते. याच कारणामुळे अनेक लहान दवाखाने किंवा प्राथमिक आयोग्य केंद्रात सर्पदंशावरील संपूर्ण उपचार व्यवस्था उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचार केले जात नाहीत.
वनक्षेत्रालगतच्या भागात धोका अधिक
शहरालगतच्या नदीकाठ, डोंगरपायथा, शेती परिसर आणि वनक्षेत्रालगतच्या वस्त्यांमध्ये सर्पदंशाच्या घटना तुलनेने अधिक घडतात. अशा भागांमध्ये ॲन्टिवेनम औषध उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची माहिती दर्शविणारे फलक, हेल्पलाईन क्रमांक आणि जनजागृती साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जनजागृतीची गरज
पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्पदंशाच्या गंभीर घटनांमध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे चार विषारी साप प्रामुख्याने आढळतात. सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नेमके कुठे जावे?, कोणत्या रुग्णालयात ॲन्टिवेनम उपलब्ध आहे?, रुग्णाला तातडीने कुठे रेफर केले जाते? याबाबत स्पष्ट माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.
नागरिकांना माहितीच नाही, उपचारासाठी कुठे जायचे?
अनेक नागरिकांशी संवाद साधला असता साप चावल्यास कोणत्या रुग्णालयात औषध उपलब्ध आहे, याची माहिती बहुतेकांना नसल्याचे आढळले. अनेक जण अजूनही पारंपरिक उपचारावर किंवा अफवांवर विश्वास ठेवत असल्याचे दिसून आले. आरोग्य विभागाकडून सर्पदंशाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.
सर्पदंश झाल्यानंतर काय करू नये...
जखमेवर चिरा मारू नयेत
विष शोषण्याचा प्रयत्न करू नये
घट्ट दोरी किंवा पट्टा बांधू नये
रुग्णाला धावपळ करू देऊ नये
मांत्रिक किंवा अंधश्रद्धेच्या उपचारांमध्ये वेळ वाया घालवू नये
योग्य वैद्यकीय उपचार केंद्रात दाखल करावे
ॲन्टिवेनम उपलब्ध असलेली पालिका रुग्णालये
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम)
नवीन थेरगाव रुग्णालय
तळेगाव रुग्णालय
कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय, आकुर्डी
नवीन भोसरी रुग्णालय जिजामाता रुग्णालय, पिॅपरी
सांगवी रुग्णालय
यमुनानगर रुग्णालय
शहरात प्रामुख्याने आढळणारे साप
विषारी साप
नाग
मण्यार
घोणस
फुरसे
बिनविषारी साप
धामण
पाणदिवड
हरणटोळ
ट्रिंकेट साप
दुतोंडी साप
पहिली धाव स्थानिक दवाखान्यात; पण तिथे उपचारांची मर्यादा
नदीकाठ, ओढे, झाडी, मोकळी मैदाने तसेच वनक्षेत्रालगतच्या वस्त्यांमध्ये सर्पदंशाचा धोका अधिक असतो. मात्र, विषारी सापाने दंश केल्यानंतर घाबरलेल्या नातेवाईकांना सर्वांत मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे रुग्णाला नेमके कुठे घेऊन जायचे? सर्पदंश झाल्यानंतर बहुतांश नागरिक जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रात जातात. कारण सुरुवातीची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. विषारी सर्पदंशाच्या गंभीर रुग्णाला पुढील उपचारांसाठी मोठ्या शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात वेळ जातो. ताेपर्यंत विष शरीरात वेगाने पसरत असल्याने हा विलंब जीवघेणा ठरू शकतो.
सर्पदंश ही ग्रामीण भागापुरती मर्यादित समस्या राहिलेली नाही. साप चावल्यानंतर नागरिकांनी नेमके कुठे जावे, कोणत्या रुग्णालयात ॲन्टिवेनम उपलब्ध आहे याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम दिसून येतो. सर्पदंशानंतरचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. योग्य माहितीच्या अभावामुळे जीव धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय भूमिका घेणे गरजेचे आहे.संकेत चौंधे, सामाजिक कार्यकर्ते
विषारी सर्पदंशाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेले ॲन्टिवेनम औषध महापालिकेच्या निर्धारित रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, ॲन्टिवेनम देण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, रूग्ण निरीक्षण व्यवस्था आणि आपत्कालीन उपचार सुविधा आवश्यक असल्याने सर्वच डिस्पेन्सरी किंवा लहान दवाखान्यांमध्ये ही सेवा उपलब्ध असू शकत नाही. त्यामुळे सर्पदंशाच्या प्रत्येक घटनेकडे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती पाहून रुग्णाला तातडीने योग्य उपचार केंद्रात दाखल करणे गरजेचे आहे.डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी, वायसीएम रुग्णालय